छत्रपती संभाजीनगर : चोरी केल्यानंतर भरधाव वेगात चारचाकी घेऊन जाताना मद्यधुंद अवस्थेतील दोनजणांनी शिवाजीनगर भागात दुकानाबाहेर लावलेल्या चार दुचाकी गाड्यांचा अक्षरश: चुराडा केला. त्यानंतर एका दुकानासमोरील टेबलसह एकाच्या घराच्या ओट्याला धडक देत कार जिन्यात घुसल्याचा प्रकार शनिवारी (दि. ८) रात्री साडेअकरा वाजता घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक राजेश यादव यांनी दिली.
पुण्यातील पाेर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच शहरातील शिवाजीनगर भागात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक गंभीर घटना घडली आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (एमएच २० बीवाय ९१३६) वेगाने शिवाजीनगरकडे आली. या कारने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. त्यानंतर कारचालकाने प्रगती हार्डवेअर या दुकानासमोर साखळीने बांधून ठेवलेल्या टेबल आणि ग्रीलला जोराची धडक दिली. पुढे या कारचालकाने रोहिणी एमोरियम समोरील तीन मोपेड आणि एका दुचाकीला धडक देत चुराडा केला.
बेफाम झालेल्या कारचालकाने संचिता ज्वेलर्सच्या ओट्याला आणि खांबाला धडक दिली. या अपघाताच्या आवाजाने नागरिक घराबाहेर आले. कार बंद पडल्याने कारमधील चालक आणि तरुणाने कारच्या दोन्ही बाजूच्या नंबरप्लेट तोडून पोबारा केला. कारचा चालक नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भरधाव वेगात आणि अनियंत्रित कार चालकाने जवळपास एक किलोमीटर अंतर कापले. सुदैवाने या दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कारमधील तरुण नशेत असल्याने जमावही संतप्त झाला होता.
कार चोरीला गेल्याची तक्रारदरम्यान, पुंडलिकनगर पोलिसांनी धडक देणाऱ्या कारचा चेसीसवरून नंबर काढला. त्यावरून मालकाचा शोध घेतला. तेव्हा धडक देणारी कार चोरीला गेल्याची तक्रार जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेली असल्याचे उघडकीस आल्याची माहिती निरीक्षक राजेश यादव यांनी दिली. दरम्यान, अपघात करणाऱ्या अज्ञात कारचालकाच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.