हिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. परिणामी, लहान बालकांना उन्हामुळे विविध आजार जडत आहेत. त्यात उष्माघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे.हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून उन्हात घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. तापमान वाढत असल्याने लहान बालकांना विविध आजार जडत आहेत. नेहमी गजबजणाऱ्या ठिकाणी उन्हामुळे शुकशुकाट दिसून येत आहे. लग्नसराई सुरू असल्याने अनेकांना उन्हातच घराबाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे. तापमान वाढत असल्याने झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बालकांना ताप, डोके दुखणे, चक्कर येणे यासह विविध आजार जडत असून उपचारासाठी रूगणालयात गर्दी होत आहे. मजुरी करणारे व शेतकऱ्यांनी शक्यतो सकाळी लवकर कामे करावीत व दुपारी आराम करावा. त्यानंतर सायंकाळी सावलीत कामे केल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो. जिल्हा दुष्काळाच्या संकटात सापडला असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ग्रामीण भागात भर उन्हातच ग्रामस्थांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात उष्णतेची लाट; बालकांना आजार
By admin | Published: April 24, 2016 11:22 PM