छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील काही मुलांनी कधी रेल्वेने प्रवास केलेला नाही. अशी जिल्हा परिषद शाळांत शिकणारी गरीब पालकांची मुले सोमवारी चक्क आता हवाई सफरीला निघाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. जिल्ह्यातील ही २८ मुलं त्रिवेंद्रम जवळील थुंबा येथील विक्रम साराभाई इस्त्रो अंतरिक्ष केंद्रला भेट देणार आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, त्यांना हवाई सफर घडावी म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत केंद्र स्तरावर २७ फेब्रुवारी राेजी १३ हजार ४९९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर ३ मार्च रोजी तालुका स्तरावरील स्पर्धा परीक्षेत १२२८ विद्यार्थी सहभागी झाले. या चाळणीतून ९१ विद्यार्थ्यांची १६ मार्च रोजी जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली होती. यातून गुणवत्तेनुसार ९ तालुक्यांचे प्रत्येकी ३ विद्यार्थी याप्रमाणे २७ विद्यार्थी आणि वैजापूर तालुक्यात दोन मुलांना सारखेच गुण मिळाल्यामुळे तेथील दोघांची निवड झाली. अशा एकूण २८ यशस्वी विद्यार्थ्यांना सरकारी खर्चातून हवाई सफरीचा योग आला आहे.
दुपारी वातानुकूलित बसद्वारे ही मुले पुण्याला निघाली. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी जयश्री कुलकर्णी यांनी निरोप दिला. तत्पूर्वी या मुलांची बस विभागीय आयुक्त कार्यालयात गेली. तिथे आयुक्त केंद्रेकर यांनी मुलांसोबत हितगुज केले व शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसोबत उपशिक्षणाधिकारी संगीता सावळे, डॉ. हाश्मी, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सोज्वल जैन व दोन शिक्षकांचा समावेश आहे.
रॉकेटचे प्रक्षेपणाचा अभ्यासहे विद्यार्थी मध्यरात्री पुणे येथून विमानाने त्रिवेंद्रमकडे रवाना होतील. तेथून ते कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकास भेट देतील. त्यानंतर १७ तारखेला ते थुंबा येथील विक्रम साराभाई इस्त्रो अंतरिक्ष केंद्राला भेट देणार आहेत. तिथे रॉकेटचे प्रक्षेपण कसे होते. त्याचे अवलोकन करणार आहेत. त्यानंतर बंगळुरू येथे नेहरू तारांगण व सर विश्वेश्वरय्या म्युझियमला भेट देणार आहेत.