छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या चौफेर यशामुळे उत्साहित झालेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरात २४ तासांत सहा कार्यक्रम घेत आगामी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याबरोबरच शरद पवार यांनी महाविकास आघाडीला एकसंघ ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसले.
शरद पवार हे शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी ७ वाजता शहरात आले आणि शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते पुण्याकडे रवाना झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी लागोपाठ सहा कार्यक्रम घेऊन शरद पवार यांनी ‘माझ्या वयाचे काढू नका’ हे वाक्य सार्थ ठरवल्याची प्रचिती कार्यकर्त्यांना आली. आपल्यातील उत्साह अद्याप कमी झालेला नाही, हेच त्यांनी दाखवून दिलेच.
शरद पवार यांच्या या दौऱ्यात साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाचा मिलाफ आढळला. त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. त्याचाच एक भाग म्हणू काँग्रेसचे जालन्यातून निवडून आलेले खासदार डॉ. कल्याण काळे यांचा सत्कारही त्यांनी केला. यावेळी काँग्रेस पक्षासह उद्धवसेनेचे कार्यकर्तेही हजर होते.
जोरदार स्वागतशरद पवार हे लोकसभा निवडणुकीनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच शहरात आले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी हजारावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अनेकांच्या हातात पुष्पगुच्छ दिसत होते. तरुण कार्यकर्त्यांचाही भरणा अधिक होता. ही गर्दी पाहून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साह दिसत होता.
विविध समाज घटकांचा विचारशरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी हज हाऊस येथे प्राचार्य मगदूम फारूकी यांनी उर्दूत अनुवादित केलेल्या एका पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली. मुस्लिम समुदायाशी संवाद साधण्याच्या दृष्टीने आणि सध्याच्या परिस्थितीत त्या समाजात विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने ते त्याठिकाणी ते दीड ते दोन तास होते. याशिवाय बाबाजानी दुर्रानी यांचा पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगरात घडवून आणला. मोतीराज राठोड यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी बंजारा समाजाशी अनेक वर्षांपासून असलेली त्यांची नाळ घट्ट असल्याचे दाखवून दिले. मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दलही त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. यामुळे ते विविध समाजघटकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
विधानसभेचे इच्छुक भेटीसाठीशनिवारी सकाळी शरद पवार थांबलेल्या हॉटेलवरही हजारभर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेल्या विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील सुमारे २५ मतदारसंघातील इच्छुकही शरद पवार यांना भेटायला आले होते. या सर्वांना शरद पवार भेटले मात्र कोणालाही काहीही आश्वासन देण्यात आले नाही, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
असा झाला शरद पवार यांचा दौराशुक्रवारी (दि. २६) ७ वाजता शहरात आगमन७ ते ९ - हज हाउस येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थितीशनिवार (दि. २७):सकाळी ९ ते ११ : शहर, मराठवाडा यासह विविध ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसकाळी ११ वा. : पत्रकार परिषददु.१२ वा : पुस्तक प्रकाशन कार्यक्रम.दुपारी ४ वा: पक्षाचा कार्यकर्ता मेळावा.सायंकाळी ५ वा. पुस्तक प्रकाशन सोहळासायंकाळी ६ वा : खा. कल्याण काळे सत्कार सोहळा