लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. पहाटे पाच ते सहा दरम्यान जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा पिकांना फायदा होणार असल्याने शेतकºयांची पिकांना पाणी देण्याची चिंता तात्पुरती का होईना मिटली आहे.भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, मंठा या तालुक्यांतील बहुतांश भागात पाऊस झाला. जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, वंजारउम्रद, जामवाडी, घाणेवाडी, तांदूळवाडी, गुंडेवाडी, निधोना, इंदेवाडी, धारकल्याण, नंदापूर, रामनगर, विरेगाव, सेवली, सिरसवाडी, रेवगाव आदी भागांत पहाटे चार ते सहा दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सकाळी दहा वाजता कडक ऊन पडले. वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर ढग दाटून आले. सुरुवातीला काही मिनिटे हलका पाऊस झाला. मात्र, सहावाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला.पावसामुळे जुना जालना भागातील टाऊन हॉल, भाग्यनगर, बाजार गल्ली, आदी भागांत पाणी साचले. नवीन जालन्यात काही ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. जालना शहरातून वाहणाºया कुंडलिका नदीवरील रामतीर्थ बंधाºयावरून प्रथमच पाणी वाहिले. पुराचे पाणी रामतीर्थ पुलाच्या खालील बाजूस असणाºया मंदिराच्या पायºयापर्यंत आले होते.या पावसामुळे शहरातील कुपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सायंकाळी बदनापूर शहरासह तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. दोन तास झालेल्या पावसाने जालना-औरंगाबाद हा रस्ता जलमय झाला होता. अंतर्गत भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.जालना परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. नागेवाडी जवळील टोल नाक्याजवळ नाल्याचे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने जालना-औरंगाबाद रस्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.नागेवाडी शिवारात सायंकाळी पाच वाजेनंतर जोदारा पाऊस झाला. त्यामुळे गावाच्या खालील बाजूने वाहणाºया नाल्याचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहू लागल्याने टोल नाक्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरुवातीला पाण्यातून वाहने नेल्यानंतर पाण्याचा जोर वाढल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. त्यामुळे जालना-औरंगाबाद मार्गावर दोन्ही बाजूने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. रात्री आठवाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.आठ वाजेनंतर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. दरम्यान, बसस्थानक परिसरात सीना नदीलाही पाणी आले होते. जालना तालुक्यातील निधोना, घाणेवाडी, पीरपिंपळगाव, गुंडेवाडी, चंदनझिरा, ढवळेश्वर भागातील नाल्यांनाही पूर आला होता.
जालन्यासह जिल्ह्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:05 AM