औरंगाबाद : शहरात शनिवारी ३९.२ अंश सेल्सिअस इतक्या रणरणत्या उन्हानंतर दुपारनंतर वातावरण अचानक बदलले. आकाशात ढगांची एकच गर्दी झाली. जोरदार वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट सुरू झाला. अर्ध्या शहरात जोरदार आणि अर्ध्या शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे पडेगाव रस्त्यावरील महाकाय वटवृक्ष एका ट्रकवर उन्मळून पडला. बनेवाडीतही सायंकाळी झाड पडले. पावसाने अनेक भागांतील वीजही गुल झाली.
तापमानात वाढ झाल्याने शहरात दुपारी उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल, असा अंदाज होता. अखेर दुपारनंतर ढगांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढेल, असे वाटत असतानाच पावसाने काही मिनिटांतच आटोपते घेतले. त्यानंतर पुन्हा थोड्या थोड्या वेळाने रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी रेल्वेस्टेशन परिसर, बाबा पेट्रोल पंप परिसरात जोरदार पाऊस पडत होता. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मिळेल त्या जागेचा आडोसा घ्यावा लागला. जवळपास १५ ते २० मिनिटे या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तर आकाशवाणी, जवाहर काॅलनी, बीड बायपास, शिवाजीनगर, सिडको आदी ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला. सायंकाळी ७.३० वाजल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटात, विजेचा कडकडाटात रिमझिम स्वरुपात पाऊस बरसत होता. पावसाच्या हजेरीने जवाहर काॅलनी, उत्तमनगर, देवळाई चौक परिसर, शिवाजीनगर आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. विजेची ये-जा होण्याचा प्रकारही काही भागांत झाला. वाऱ्यामुळे पडेगाव रस्त्यावरील वटवृक्षासह बनेवाडीत झाड पडले.
२१ कि.मी. प्रतितास वाऱ्याचा वेग
एमजीएम वेधशाळेत ०.८ मिलीमीटर तर गांधेली येथे १.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात २१ किलोमीटर प्रतितास तर गांधेलीत ४२ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले, अशी माहिती हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.