छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आल्याने कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील एका दीड वर्षाच्या बालकाचा नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला, तर फुलंब्री तालुक्यातील शेवता येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा गिरजा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. तसेच सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना रात्री ८ वाजता घडली.
जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे खुलताबाद तालुक्यातील ममुराबाद येथील दोन युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना ग्रामस्थांनी धाव घेतल्याने त्यांना वाचविण्यात यश मिळाले. सोयगाव शहरातील एका घराची भिंत कोसळून आजी व नातू जखमी झाले, तसेच पैठण तालुक्यातील बालानगर येथे घराची भिंत कोसळून ८ वर्षीय बालक जखमी झाला. याशिवाय सोयगाव शहरालगतच्या सोना नदीच्या पुराचे पाणी १५ घरांमध्ये शिरले; दोन घरे कोसळली, तसेच सिल्लोड शहर, खुल्लोड, चिंचवन, आमसरी, देऊळगाव बाजार येथील जवळपास २० घरांची पडझड झाली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ येथील धबधबा वाहू लागला आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
जिल्ह्यात कुठे काय झाले?१) फुलमस्ता, येळगंगा, गिरिजा, धांड, पूर्णा, वाघूर, गल्हाटी, वीरभद्र, सोना, बहुला, हिवरा, अंजना, कोळंबी, इसम, खडकी, शिवना, गंधारी, गिरिजा व फुलमस्ता नद्यांना पूर२) सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील ३५ घरांच्या भिंती कोसळल्या३) अनेक गावांचा संपर्क तुटला४) सिल्लोड-जळगाव मार्गावरील वाहतूक ९ तास ठप्प५) घाटनांद्रा-पाचोरा घाटात दरड कोसळली