वाळूज महानगर : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगर परिसरात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागासह रस्त्यावर पाणी साचले. तर काही भागातील वीजपुरवठाही खंडीत झाला. परंतू या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
वाळूज महानगर परिसरात जून महिना संपत आला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. महिनाभरात तोही काही भागातच तीन-चारा वेळा हलका पाऊस झाला आहे. आभाळ येऊनही पाऊस हुलकावणी देत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पावसाची चिंता लागली होती. पण तीन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा पावसाचे आगमन झाले. गुरुवारी सकाळी कडक ऊन पडल्याने उकाडा वाढला होता.
मात्र, दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. आभाळात ढग दाटून आल्याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिट रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा रात्री ८ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री दीड -दोन वाजेपर्यंत पावसाच्या सरी सुरुच होत्या. परिसरातील तीसगाव, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, वळदगाव, रांजणगाव, साजापूर भागात दमदार पाऊस झाला.
तर वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, लांझी, पाटोदा, बकवालनगर भागात हलका पाऊस झाला. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसह शेतकºयांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.