बीड : केवळ ढगाळ वातावरण आणि वादळी वाºयाने होरपळलेल्या पिकांना शनिवारी रात्री झालेल्या संततधार पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून शेतकºयांच्या चेहºयावर हसू फुलले आहे. ग्रामीण भागातील काही छोट्या पुलांवरून पाणी वाहिल्याने गावांचा काही तासांसाठी संपर्क तुटला होता. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी संततधार सुरूच होती. सायंकाळी पावसाने उघडीप दिली.यावर्षी जूनच्या सुरूवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सुरुवातीला झालेल्या छोट्या-मोठ्या पावसावर शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके जोपासली. परंतु केवळ पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने अनेक भागातील पिके सुकू लागली होती. काही ठिकाणी तर शेतकºयांनी दुबार पेरणी केली होती. पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे असायच्या. दिवसभर केवळ ढग यायचे आणि निघून जायचे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.अशा परिस्थितीत सावकारासह बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता त्यांना होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर आज-उद्या पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकºयांना असायची. परंतु हा अंदाज आतापर्यंत कागदावरच राहिला. शनिवारीही मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यावेळेस मात्र हा अंदाज खरा ठरल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. परळी, बीड, गेवराई आदी तालुक्यात रिपरिप पाऊस झाला होता. कोठेही जोरदार पाऊस झाला नव्हता. परंतु सायंकाळी सात नंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने संततधार हजेरी लावली. हा पाऊस रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरूच होता. कधी मध्यम तर कधी जोरदार अशा स्वरूपात हा पाऊस होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ वातावरण कायम राहिले.
अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:52 AM