औरंगाबाद : शहरवासीयांची मंगळवारची पहाट सुरू झाली ती पावसानेच. तब्बल १२ दिवसांनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. कधी संथ, तर कधी मध्यम स्वरूपात दुपारी १२ वाजेपर्यंत पाऊस बरसला. दुपानंतर मात्र पावसाने ओढ दिली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एमजीएम वेधशाळेत २६.२, तर चिकलठाणा वेधशाळेत सकाळी ११.३.० वाजेपर्यंत १७.० मि.मी. पावसाची नोंद झाली.
यंदाच्या पावसाळ्यात अनेक दिवस पावसाविना कोरडेच गेले. शहरात १९ ऑगस्ट रोजी औरंगाबादकरांना पहिल्यांदाच संततधार पावसाचा अनुभव आला होता. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरविली. शहरात सोमवारी पावसाचे काही थेंब बरसले. मात्र, मंगळवारी पहाटेपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली. सकाळीच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सिडको, हडको, चिकलठाणा, छावणी, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन, गारखेडा, शिवाजीनगर, गारखेडा अशा सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली. शहर परिसरातील डोंगर ढगांमध्ये हरवले होते. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली.
सिडको-हडकोत अधिक पाऊस
चिकलठाणा परिसराच्या तुलनेत सिडको, हडको परिसरात काहीशा अधिक पावसाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी सकाळी ८.३० ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.० मि.मी. पावसाची नोंद झाली तर एमजीएम वेधशाळेत २६.२ मि.मी. आणि गांधेली येथील वेधशाळेत २१.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.