कन्नड ( औरंगाबाद ) : मंगळवारी दिवसभर आणि रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी आणखी वाढेल या धास्तीने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. तालुक्यात आठही महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाडी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. अतिवृष्टीमुळे शिवना नदीला आलेल्या महापुराने हाहाकार माजवला आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या महापुराने अंधानेर, शिवनानगर, बहिरगाव, डोनगाव, हतनुर या गावातील ग्रामस्थांनी भीतीपोटी रात्र जागून काढली. बुधवारी सकाळी पुर ओसरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
हेही वाचा - जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात
शिवना नदीवरील हतनुर येथील कोल्हापुरी बंधारा पुरामुळे फुटला आहे. जळगावघाट ते जैतापुर रस्त्यावरील पुल वाहून गेला. चिवळी येथे मातीनालाबांध फुटला तर नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी ओसरत असतांनाच बुधवारी सकाळी पावसाची रिपरिप पुन्हा सुरु झाली आहे.
महसुल मंडळ निहाय बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात पडलेला पाऊस : कन्नड ११६ मिमी, चापानेर १५० मिमी, देवगाव ११० मिमी, चिकलठाण ११० मिमी, पिशोर ११७ मिमी, करंजखेडा ११२ मिमी,नाचनवेल ७७ मिमी व चिंचोली ७४ मिमी
हेही वाचा - जायकवाडीतील पाणीसाठा ५० टक्क्यांकडे; स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने आवक वाढली