छत्रपती संभाजीनगर : वेरुळ येथील घृष्णेवर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून जवळपास लाखो भाविक येणार असल्याने ७ ते ११ मार्च दरम्यान घृष्णेवर कडे जाणारे तीन महत्वाचे मार्ग जड, अवजड व हलक्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
८ मार्च रोजी सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वेरुळ येथील घृष्णेवर मंदिरात देखील ७ ते ११ मार्च दरम्यान महायात्रेचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश असेल. यंदा राज्यभरातून ५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. मंदिरासह तिर्थकुंड, वेरुळ लेणी एकाच मार्गावर असल्याने पोलिसांनी ५ दिवस तीन महत्वाच्या मार्गांवरील वाहतूकीत बदल केला आहे. नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी केले आहे.
असा असेल बदल-छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद मार्गे वेरुळ, कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शेरणापुर फाटा, दौलताबाद टि पॉईंट, माळीवाडा, कसाबखेडा, वेरुळ मार्गे कन्नड कडे जातील.-वेरुळ, खुलताबाद दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने वेरुळ, कसाबखेडा, माळीवाडा, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.- फुलंब्री, खुलताबाद, वेरुळ, कन्नड, धुळे कडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नगरनाका, शेरणापुर फाटा, दौलताबाद, माळीवाडा, कसाबखेडा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाईल.