सोयगाव : रबी हंगामात लागवड केलेल्या सूर्यफूल पिकांची उंची मक्याच्या बरोबरीने वाढत आहे. मात्र, फुलांचा आकार कमी असल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या रबी हंगामात सूर्यफूल पिकासाठी पोषक हवामान असल्याने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना सूर्यफुलाची लागवड केली. पोषक वातावरणामुळे या पिकाची उंची मक्याच्या बरोबरीने झाली असून यावरील फूल बहरलेल्या अवस्थेत कमी आकाराचे आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यावर शेतकऱ्यांनी प्रायोगिक शेतीवर भर दिला होता. यामध्ये बटाटे आणि टोमॅटो यासह मेथी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले. टोमॅटे तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांनी उशिरा सूर्यफुलाची लागवड केली. या पिकाची उंची मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, उंची वाढल्याने फुलांचा आकार कमी पडला आहे. यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फोटो : शेतात वाढलेले सूर्यफूल पीक.