मुख्यमंत्री ठाकरे यांचे अमरावती येथून दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे होते. या आढावा बैठकीत रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय सिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, ‘एमआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एल अँड टी कंत्राटदार कंपनीच्या वतीने ठाकरे यांना अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज क्र. १० प्रकल्प, प्रकल्पाची ५७.९० कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पासंदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडले.
चौकट............
करारानुसार डिसेंबर २०२१ पर्यंतची मुदत
औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग जात आहे. जिल्ह्यातील या महामार्गाचे काम ‘एल अँड टी’ व मेगा इंजिनिअरिंग या दोन कंत्राटदार कंपनी करत आहेत. ‘एमआरडीसीने’ या दोन कंपन्यांसोबत केलेल्या कामाच्या करारानुसार डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये हे काम बाधित झाले असले, तरी मे महिन्यापर्यंत या दोन्ही कंत्राटदार कंपन्यांकडून काम पूर्ण करून घेण्याचा विश्वास ‘एमआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.