पाचोड (औरंगाबाद ) : ''हॅलो, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतोय. आपल्या गावात दुष्काळ परिस्थिती कशी आहे ? पाणी टंचाईची स्थिती काय आहे ?'' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैठण तालुक्यातील निवडक सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे थेट संवाद साधला.
पाचोड गावासह परिसरातील गावागावात यावर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैठण तालुक्यातील निवडक सरपंच, ग्रामसेवक व अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी मुरमा गावचे सरपंच एकनाथ फटांगडे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. गावात दुष्काळ परिस्थिती कशी आहे, पाण्याचे टँकर किती सुरू आहेत, चारा छावण्या विषयी माहिती त्यांनी संरपंच फटांगडे यांच्याकडून जाणून घेतली.यानंतर मुख्यमंत्र्यांनी लवकरच दुष्काळावर अधिक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.