औरंगाबाद : शहरातील वाहन वितरकांना दुचाकीसोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीने हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, अनेक दुचाकीस्वार त्यांचे हेल्मेट हँडलला किंवा दुचाकीच्या पाठीमागे लॉकने बांधून ठेवतात. दुचाकीवर नावालाच हेल्मेटचा वापर होतो. त्यामुळे नव्या दुचाकीसोबत दोन हेल्मेट कशाला आणि त्यातून रस्त्यावरील हे चित्र बदलेल का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
रस्ते अपघातात बहुतांश जण डोक्याला मार लागल्याने मृत्युमुखी पडले आहेत. त्यांनी जर हेल्मेट घातलेले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, हे यापूर्वीच्या अनेक घटनांतून समोर आले आहे. त्यामुळे शहरात प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे, यासाठी पोलिसांकडून काही वर्षांपूर्वी जनजागृती, समुपदेशनाबरोबर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली. स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेकांनी हेल्मेटचा वापर सुरूकेला. मात्र, काहींनी फक्त कारवाई आणि दंडाच्या भीतीने हेल्मेटचा वापर सुरूकेला; परंतु अनेक महिने लोटल्यानंतरही अद्यापही हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांच्या अंगवळणी पडलेली नाही.
हेल्मेटच्या वापरात अनेक जण पळवाटा काढताना दिसतात. अनेक दुचाकीस्वार त्यांचे हेल्मेट दुचाकीच्या हँडलला आणि पाठीमागे लॉक करून ठेवतात. घरातून निघताना दुचाकीच्या आरशामध्ये हेल्मेट अडकविले जाते. सिग्नल लागताच हेल्मेट घालायचे आणि थोडे अंतर पुढे गेले की पुन्हा हेल्मेट काढून ठेवण्याची कसरत दुचाकीचालक करताना दिसतात. पोलिसांना दाखविण्यापुरताच हेल्मेटचा वापर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रत्यक्ष वापरासाठी हवे प्रयत्नकाही वेळा दुचाकीचालकाने हेल्मेट घातल्याने तो बचावल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; परंतु मागे बसलेल्या व्यक्तीला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हेल्मेटच्या वापराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नव्या दुचाकीसोबत एक नव्हे, तर दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु केवळ ग्राहकांच्या खिशातून पैसे उकळण्याचा प्रकार होता कामा नये. प्रत्यक्ष दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर सुरूहोईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे दिसते.