औरंगाबाद : जपानच्या वाकायामा शासनाने यापूर्वी ऐतिहासिक औरंगाबाद शहराला मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरघोस निधी दिला आहे. यापुढेही अजिंठा-वेरूळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.वाकायामा आणि महाराष्ट्र शासन यांच्यात मागील वर्षी झालेल्या सामंजस्य करारानुसार एमटीडीसीच्या औरंगाबादेतील कार्यालयात एक स्वतंत्र कार्यालयाच सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात जपानचे अधिकारी नोबुओ मियामोटो २४ तास उपलब्ध राहणार आहेत. भविष्यात अजिंठा-वेरूळ येथे कोणते प्रकल्प राबविणे शक्य आहे, यासंदर्भात विचारविनिमय सुरू झाला आहे. अजिंठा लेण्यांच्या परिसरात एमटीडीसीने बरीचशी जागा संपादित केलेली आहे. या जागेचा चांगला उपयोग कसा करता येईल. ग्रीन एनर्जीसारखे प्रकल्प राबविणे शक्य आहे का? याचीही शहानिशा करण्यात येत आहे.पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी- सुविधा कशा मिळतील यावर वाकायामा शासनाचे अधिकारी भर देणार आहेत. या कामांसाठी एक हजार कोटी रुपये लागले तरी खर्च करण्याची तरतूद वाकायामा शासनाकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार पर्यटकांमध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. एमटीडीसी प्रशासन अजिंठा-वेरूळ येथे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारी कोणती कामे करावी लागतील याची चाचपणी सध्या करीत आहे. यासंदर्भातील एक सविस्तर प्रस्तावही लवकरच वाकायामा शासनाला प्रदान करण्यात येणार आहे.
जपानच्या मदतीने कोटींचे प्रकल्प
By admin | Published: September 11, 2014 1:26 AM