सोयगाव ( औरंगाबाद ) : केंद्र आणि राज्याच्या सत्तेतील दोन मंत्री लाभलेल्या सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीची दाहकता गंभीर आहे.या अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळीपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरात मदत न मिळाल्यास सत्तेवर असलेल्यांना शेतकऱ्यांचा इंगा दाखवीत सळो कि पळो करणार असल्याचा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी दिला. यावेळी अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळी पर्यंतचा अल्टीमेटम देवून राज्य सरकारला जाधव यांनी इशारा दिला आहे.
अतिवृष्टीच्या बाधित क्षेत्राचे १३ मे २०१५ आणि २५ जानेवारी २०१८ प्रमाणे काढण्यात आलेली राज्य आणि केंद्र शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. मागील वर्षीच्या रखडलेल्या पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावावा,आणि या वर्षीही पिक विमा मंजूर व्हावा या मागण्यांसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट सोयगाव तहसील कार्यालयावर आसूड आणि रुमणे मोर्चा काढला होता.या मोर्चाला तालुका कृषी कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली थेट तहसील कार्यालयावर या मोर्चाला समारोप करण्यात आला. यावेळी समारोप करतांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य शासनाला थेट मदतीचा अल्टीमेटम देत दिवाळीपर्यंत मदत देण्याची आग्रही मागणी या मोर्चाद्वारे केली आहे. यावेळी जाधव यांनी राज्य आणि केंद्र शासनावर चौफेर टीका करत सोयगाव तालुक्याला केंद्र आणि राज्य शासनाचे दोन मंत्री लाभलेले आहे परंतु तरीही या तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर आहेत अशी व्यथा मांडली.
शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाल्याने अखेरीस पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी मध्यस्थी केल्याने नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात ज्ञानेश्वर युवरे, मुरलीधर वेहळे, खेमराज जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विजयसिंग सोळंके, प्रेमसिंग शिंदे, सावकार महाजन, ईश्र्वर सपकाळ,दीनेश जाधव,आप्पा वाघ,सजंय पाटील छोटु रामकोर,चेतन पाटील,रुषी सोनवणे, आबा जाधव, शिवाजी पवार,बंन्डु पाटील,नगराज पाटील,युवराज जाधव, समाधान चोपडे,अमोल शेळके,डीगांबर जाधव,प्रभु तायडे,ज्ञानेश्वर पाटील,अमोल माने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, उन्हात तापलेल्या माजी आमदार जाधव यांची प्रकृती अचानक बिघडली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
मोर्चातील प्रमुख मागण्या : १)सोयगाव तालुक्यातील बाधित क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावे. २)दिवाळीच्या आत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.३)मागील वर्षीच्या पिक विम्याचा लाभ द्यावा४)या वर्षीही पिक विमा मंजूर करावा