औरंगाबाद : इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून एखाद्याला मदत करू शकता. अशाच प्रकारची आगळीवेगळी मदत शहर पोलिसांंनी सिमला (हिमाचल प्रदेश) येथे अडचणीत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील पर्यटक महिलांना केली. सिमला येथे फिरायला गेलेल्या महिलांना टुरिस्ट टॅक्सीचालक अकारण त्रास देत होता. याबाबतची तक्रार त्यांनी सिमला येथून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयातील व्हॉटस्अॅप मोबाईल क्रमांकवर पाठविली होती. पश्चिम बंगाल राज्यातील काही सरकारी महिला हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या सिमला पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांनी टुरिस्ट टॅक्सी भाड्याने घेतली होती. त्या टॅक्सीचा चालक या महिलांशी सतत गैरवर्तन करून अपशब्द वापरत होता. त्यामुळे पर्यटक महिला घाबरल्या होत्या. तेथे कोणत्या पोलीस ठाण्यात जावे आणि तक्रार करावी, याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. अनोळखी शहरात कोणाची मदत घ्यावी, या चिंतेत त्या असताना त्यांना एका व्यक्तीने औरंगाबाद पोलिसांच्या व्हॉटस्अॅपचा मोबाईल क्र मांक (८३९००२२२२२) दिला. या क्रमांकावर त्या महिलांनी २६ मे रोजी सकाळी एक तक्र ार सिमला येथून पाठविली आणि मदतीची विनंती केली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्र्शनाखाली सोशल मीडिया सेलचे पोलीस उपनिरीक्षक तोडकर यांनी त्या महिलांशी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीची सविस्तर माहिती जाणून घेऊन सिमला पोलिसांशी त्यांनी संपर्क साधला. त्यांच्याकडे या महिलांची तक्रार पोहोचवली आणि तक्रारींचा पाठपुरावा केला. त्यामुळे सिमला पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत केली. ही मदत मिळाल्यानंतर त्या महिलांनी पुन्हा पोलीस आयुक्तांच्या व्हॉटस्अॅप नंबरवर मेसेज पाठवून केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
सिमला येथे अडचणीत सापडलेल्या महिलांना शहर पोलिसांकडून मदत
By admin | Published: May 29, 2016 12:22 AM