छत्रपती संभाजीनगर : नक्षत्रवाडीतील एका झाडाखाली चार दिवसांपासून वृद्ध महिला पडून असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. तेव्हा पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला. महिलेच्या मुलाने तीन वर्षांपूर्वीच गाव सोडले होते. तो कोठे राहतो हे कोणालाच माहित नाही. इतर नातेवाईकांनीही मदतीसाठी हात वर केल्यामुळे दामिनी पथकानेच महिलेची एका वृद्धाश्रमात व्यवस्था केल्याची माहिती निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी दिली.
दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे यांना नक्षत्रवाडीत एक महिला चार दिवसांपासून झाडाखाली बसून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक फासाटे यांनी त्याविषयीची माहिती वरिष्ठांसह नियंत्रण कक्षाला देत हवालदार सुभाष मानकर, सुजाता खरात, विष्णू पाथ्रे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध महिलेची चौकशी केल्यानंतर तिने कल्पना राजेंद्र इंदाने ( रा. खमके वस्ती, वाकळी गाव, ता. राहता, जि. अहमदनगर) असे सांगितले.
महिलेस नातेवाईकांची माहिती सांगता येत नव्हती. तेव्हा उपनिरीक्षक फासाटे यांनी स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधत वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी महिला गावात एकटीच राहत असून, तिच्या मुलाने तीन वर्षांपूर्वीच गाव सोडले आहे. तो कोठे राहतो, त्याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच इतर नातेवाईकांनीही हात वर केले.
त्यामुळे दामिनी पथकाने महिलेला निवारा मिळण्यासाठी दैवत वृद्धाश्रम, गोळेगाव गदाना येथील तुपे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वृद्धेची संपूर्ण जबाबदारी स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार वरिष्ठाच्या परवानगीने दामिनी पथकाने महिलेस वृद्धाश्रम येथे नेऊन सोडले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, निरीक्षक अम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.