औरंगाबाद : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची खूणगाठ बांधली होती. दुसऱ्यांची मदत न घेता स्वबळावर उद्योग करण्याचा विचार होता. महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करणे ही तेवढी सोपी गोष्ट नसते. पदवीचे शिक्षण झाले; पण उद्योग सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. मात्र, जिद्दीच्या जोरावर प्रीती पाटील-गुळवे यांनी स्वत:चे उद्योगविश्व उभे केले असून, क्वॉलिटी मेकॅट्रोनिक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स पार्टस्ची निर्मिती व पुरवठ्याचे काम त्या यशस्वीरीत्या करीत आहेत.
प्रीती पाटील-गुळवे सांगतात, २००९ मध्ये पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस जॉब केला. उद्योग सुरू करायचा म्हणजे त्यासाठी थोडेबहुत भांडवल लागते. म्हणून २०१२ मध्ये स्वत:ची एक कन्सल्टन्सी सुरू केली. २०१४ पासून जॉबवर्क सुरू केले. बागला ग्रुपसाठी स्टार्टर रिले असेंब्ली हा जॉब तयार केला जायचा. त्याच वर्षी लग्न झाले. पती मुंबईला नोकरी करीत होते; परंतु त्यांनी तुझे स्वप्न हे माझे स्वप्न आहे, या भूमिकेतून मला उद्योगासाठी सहकार्य केले. दोन वर्षांपूर्वी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला आहे.
कंपनीमध्ये पीसीबीचे (प्रिंटेड सर्किट बोर्ड) उत्पादन केले जाते. या उद्योगाची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांची आहे. स्त्री-पुरुष समानता हा विचार केवळ व्याख्यानात किंवा ऐकण्यापुरता चांगला वाटतो; पण कृतीत मात्र दिसत नाही. स्त्री उद्योग करू शकते किंवा तिने तो करावा, असे कुटुंबालाही वाटत नाही. एवढेच नाही, तर मोठ्या उद्योगांनासुद्धा हा विचार पटत नसावा कदाचित. व्हेंडरशिप डेव्हलपमेंटसाठी कर्तृत्ववान महिलेला प्राधान्य दिले पाहिजे, असा विचार मोठ्या उद्योगांनी करावा. उद्योगांमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.
महिलांचे मॅनेजमेंट परफेक्ट असतेजास्तीत जास्त युवतींनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी पैसा नाही, तर जिद्द, तीव्र इच्छाशक्तीची गरज असते. महिला जर घरसंसार सांभाळू शकते, तर ती उद्योगसुद्धा व्यवस्थित चालवू शकते. तिचे मॅनेजमेंट परफेक्ट असते. यासाठी मोठ्या कंपन्या असतील किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिलांना व्हेंडरशिपसाठी आरक्षण ठेवले पाहिजे. त्यासाठी टर्नओव्हरची अट नसू नये. शासनानेदेखील या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामुळे उद्योग-व्यवसायाकडे युवतींचाही कल वाढेल.