लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक स्मारकांवर झाडे-झुडपे वाढली असून, सततच्या पावसामुळे भिंतींनी ओलावा धरला आहे. त्यामुळे या वास्तूंच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असून, मनपा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन वास्तूंच्या संवर्धनासाठी योग्य उपाययोजना हाती घेण्याची गरज असल्याचे इतिहासप्रेमींनी ‘लोकमत’ला सांगितले.‘औरंगाबाद वारसा संवर्धन समिती’चे सदस्य आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे म्हणाले की, ‘शहरातील ऐतिहासिक वास्तू बांधताना चुना वापरण्यात आला आहे. हा चुना (लाईम) झाडांच्या वाढीसाठी पोषक असतो. त्यामुळे हेरिटेज वास्तंूवर झाडांची वाढ झपाट्याने होते. त्यात जोरदार पाऊस पडतोय. झाडांच्या मुळांद्वारे पावसाचे पाणी ढाच्यामध्ये सगळीकडे मुरते. त्यामुळे मूळ वास्तूची सुरक्षितता धोक्यात येते. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर वास्तू पडण्याचा धोका निर्माण होतो.’शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजांवर शेवाळ आणि छोट्या झाडाझुडपांनी ताबा घेतला आहे. इतिहासप्रेमींनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करूनही वास्तूंच्या संवर्धनासंबंधी काहीच करण्यात आले नाही. भूमिगत गटार व पुलाच्या कामामुळे कमजोर पडलेल्या कटकटगेटचा एक भाग पावसाच्या माºयामुळे मागच्या आठवड्यात पडला. ‘आपला ऐतिहासिक वारसा जतन करून ठेवण्यासाठी त्यांची योग्य निगा राखणे गरजेचे आहे. वास्तूंवरील झाडे वाढू न देणे, त्यांच्या मुळांमुळे पडलेल्या भेगा बुजविणे, वॉटरप्रूफिंग आदी कामे नियमित करणे अपेक्षित आहे; परंतु महापालिका याकडे साफ दुर्लक्ष करते. वर्षानुवर्षे वारसा स्थळांकडे कोणीही पाहत नाही. अशाने या वास्तू कशा सुरक्षित राहतील? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. मध्यंतरी मनपाने हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनासाठी तीन निविदा काढल्या; परंतु एकालाही प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील मनपाच्या अधिकारात येणाºया ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची जबाबदारी असणाºया ‘मनपा हेरिटेज कमिटी’चे अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी सांगितले की, कमिटीच्या मागच्या दोन्ही बैठकांमध्ये आम्ही आयुक्तांना वास्तूंवरील झाडे काढण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच यंदा बजेटमध्ये संवर्धनासाठी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच याविषयी काम सुरू करण्यात येईल.
हेरिटेज वास्तंूना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:38 AM