छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांनंतर अखेर ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, अर्धेअधिक शैक्षणिक वर्ष संपून आता परीक्षेची लगबग सुरू आहे. दरम्यान, आता वसतिगृहासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलामुलींसाठी शंभर क्षमतेचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी संघटनांनी स्वतंत्र वसतिगृहांची मागणी लावून धरली होती. मात्र, वसतिगृहाच्या मागणीला दोन वर्षांपासून सतत खो मिळत गेला. राज्य सरकारने सन २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात मुलामुलींसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर २०२३ मध्ये पावसाळी अधिवेशनात ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी १५ ऑगस्टपर्यंत वसतिगृह सुरू करण्याचे आश्वासन दिले. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनात महिनाभरात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली. ही मुदत उलटल्यानंतर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती.
त्यानुसार आता कुठे शहरात चिकलठाणा परिसरातील वोखार्ड कंपनीजवळ विद्यार्थ्यांसाठी, तर रेल्वेस्टेशन रोडवर मुलींच्या वसतिगृहासाठी इमारती भाड्याने घेतल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात (२०२३-२४) बारावीनंतर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाच्या प्रवेशासाठी ५ मार्चपर्यंत ऑफलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेशाची पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार १५ मार्चपर्यंत अंतिम केली जाणार आहे. या पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना २५ मार्चपर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची २८ मार्च रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना ५ एप्रिलपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.
वसतिगृहांसाठी शंभर जागांचे आरक्षणओबीसी विद्यार्थ्यांच्या दोन वसतिगृहासांठी इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता ५१, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी ३३, विशेष मागास प्रवर्गासाठी ०६, दिव्यांगांसाठी ४, अनाथ २ व आर्थिक मागास प्रवर्गासाठी ४ अशा प्रत्येक वसतिगृहात शंभर जागा भरण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.