औरंगाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या अवघ्या दीड तासांच्या मुसळधार पावसाने हर्सूल तलाव ( hersul lake) तुडुंब भरला. २८ फूट तलावाची उंची आहे. तलाव भरण्यासाठी फक्त ६ फूट पाण्याची गरज होती. मध्यरात्री २ वाजता तलाव ओसंडून वाहू लागला. सकाळी सोशल मीडियावर ( social media ) तलाव भरल्याचे फोटो व्हायरल होताच बघ्यांची एकच गर्दी झाली. दुपारी पाेलिसांना तलावाच्या सांडवा परिसरात बंदोबस्त तैनात करावा लागला.
हर्सूल तलाव भरल्याने शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीही तलाव पूर्णपणे भरला होता. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सोमवारी तलावात २४ फुटांपर्यंत पाणी होते. मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीने तलाव तुडुंब भरला. रात्री सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले. नदीपात्राच्या परिसरात अनेक वसाहती आहेत. पावसाचे पाणी वाढले तर अनेक वसाहतींमधील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ मनपावर आलेली आहे. बुधवारी सकाळीच मनपाने काही वसाहतींमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता अशोक पद्मे यांनी दिली. हर्सूल तलाव भरल्याचे काही फोटो सकाळीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तरुणाई सकाळीच तलावाच्या सांडवा परिसरात गर्दी करू लागली. दुपारी गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला.
खाम नदी वाहू लागली आहेगतवर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पालिकेने येथील जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करून जुन्या शहरातील काही भागांना पाणीपुरवठा सुरू केला होता. उन्हाळ्यातही तलावात पाणी असल्याने आवश्यकतेनुसार 3 ते 4 एमएलडी पाण्याचा उपसा पालिकेकडून केला जात असे. याप्रमाणे आजवर पाणीपुरवठा सुरू आहे. आता तलाव पूर्णपणे भरल्याने 4 ते 5 एमएलडी पाणी उपसा करून जुन्या शहरातील आणखी वाॅर्डांत हे पाणी वळविले जाईल. त्यातून जायकवाडी धरणातील पाणी इतर भागांना वळवून त्यांना मुबलक पाणीपुरवठा करता येईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी स्पष्ट केले.
दररोज ५ एमएलडी पाण्याचा वापर१९५४ साली निजाम स्टेटने हर्सूल तलाव बांधला. १९७५ पर्यंत शहराची तहान हर्सूल तलावातून भागत होती. नहरींच्या पाण्याचीही शहराला मदत होत होती. शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे. शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांना आजही हर्सूलचेच पाणी देण्यात येते. दररोज ५ एमएलडी पाण्याचा उपसा मनपाकडून करण्यात येतो.