औरंगाबाद : तुडुंब भरलेल्या हर्सूल तलावातून महापालिकेने जुन्या शहरातील काही वसाहतींना आठ दिवसांपासून दररोज ४ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याचे वितरण सुरू केले आहे. हर्सूल तलावारील पाण्यामुळे जायकवाडीवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी झाला आहे. जुन्या शहरातील काही वसाहतींना तब्बल आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. आता पाचव्या दिवशी पाण्याचे वितरण होत आहे.
हर्सूल तलावाजवळच महापालिकेचे शुद्धीकरण केंद्र आहे. शुद्ध केलेले पाणी थेट दिल्लीगेट पाण्याच्या टाकीवर आणण्यात येत आहे. दिल्लीगेट येथून आसेफिया कॉलनी, लेबर कॉलनी, हर्षनगर, मंजूरपुरा, कटकटगेट आदी परिसरातील वसाहतींना पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
हर्सूल तलावाच्या पाण्यावर किमान ७० हजार नागरिकांची तहान भागत असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. तलावातून आणखी जास्त क्षमतेने पाण्याचा उपसा करता येऊ शकतो का, यासंदर्भातील तपासणी करण्यात येत असल्याचे धांडे यांनी नमूद केले. हर्सूल तलावाचे पाणी साधारण जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.