औरंगाबाद : हर्सूल कचराप्रक्रिया प्रकल्पाचे काम एक वर्षापासून बंद पडले आहे. नियोजित प्रकल्पाच्या जागेचा वाद मागील वर्षी उफाळला होता. त्यानंतर महापालिकेने महसूल विभागाकडून अतिरिक्त जागा मागितली आहे. अजूनपर्यंत महसूलकडून जागा प्राप्त झालेली नाही. त्यामुळे प्रकल्प वर्षभरापासून रखडला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास शहरात सध्या जेवढा कचरा निघत आहे त्यावर एकाच दिवसात प्रक्रिया करणे शक्य होईल.
शहरात एकूण चार कचराप्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला दिला होता. या प्रस्तावानुसार राज्य शासनाने महापालिकेला १४८ कोटी रुपये मंजूर केले. पडेगाव आणि चिकलठाणा येथील प्रत्येकी दीडशे मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले. हर्सूल येथील दीडशे मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प आजपर्यंत सुरू होऊ शकला नाही. कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या जागेवर काही खासगी नागरिकांनी मालकीचा दावा केला आहे. त्यामुळे पालिकेने तालुका भूमिअभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करून घेत पालिकेच्या नियोजित जागेवर अर्धवट प्रकल्प उभारला आहे. मात्र, प्रकल्पाचे पुढील काम पूर्ण करण्यासाठी पालिकेला आणखी दीड हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासंदर्भात पालिकेने महसूल विभागाकडे प्रकल्पाला लागून असलेली जागा मागितली. महसूल विभागाने खासगी व्यक्तीच्या नावावर असलेली जागा अगोदर शासनाच्या नावावर करून घेतली. त्यानंतर आता महापालिकेला जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. जागा न मिळाल्यामुळे आजपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. शहरात दररोज चारशे ते साडेचारशे मेट्रिक टन कचरा निघत आहे. त्यातील तीनशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.
वर्षभरापासून मजूर बसून
हर्सूल कचराप्रक्रिया प्रकल्पाचे सिव्हिल वर्कचे काम करण्यासाठी घेतलेल्या कंत्राटदाराचे मजूर मागील वर्षभरापासून बसून आहेत. त्यामुळे कंत्राटदारास कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे. कंत्राटदार काम सोडून देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.