डॉ. खुशालचंद बाहेती । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मोबाइल चोरीला गेला आणि पोलीस प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार मोहित नावंदर नावाच्या संगणक शाखेच्या विद्यार्थ्याने थेट पंतप्रधानांनाच केली. ती तक्रार तब्बल दीड वर्षानंतर जिन्सी पोलीस ठाण्याकडे वर्ग झाली. मग जिन्सी पोलिसांनी शोध सुरू केला. मधल्या काळात मोहितने औरंगाबाद सोडले. तो पुण्याला गेला. त्याने स्वत:च मोबाइलमधील ट्रॅकरच्या साहाय्याने चोरीला गेलेला मोबाइल शोधलाही व मिळवलाही. आता ही एवढी बाब त्याने थेट पीएमसाहेबांना कळवावी, तसा एखादा मेल तरी करावा, म्हणजे हे प्रकरण मिटेल, असे साकडेच पोलीस मोहितला घालत आहेत. यासंबंधीची कहाणी मोठी रंजक आहे. ५ जानेवारी २०१५ रोजी मोहितचा मोबाइल तो शिकत असलेल्या महाविद्यालयातून चोरीला गेला. हा मोबाइल त्याला त्याच्या मोठ्या भावाने पहिल्या पगारातून भेट दिला होता, त्यामुळे त्यात त्याच्या भावना दडलेल्या होत्या. मोबाइल चोरीची तक्रार घेऊन त्याने जिन्सी पोलीस ठाणे गाठले; पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. महाविद्यालयाची बदनामी होईल, म्हणून अशा तक्रारी घेता येत नाहीत, असे कारण मोहितला सांगण्यात आले; मात्र जिद्दी मोहितने पाठपुरावा चालूच ठेवला. शेवटी जिन्सी पोलिसांनी मोबाइल हरवल्याची नोंद घेतली; पण भावाकडून भेट मिळालेला मोबाइल सापडत नाही आणि त्यासाठी पोलीस काही करीत नाहीत, यामुळे तो अस्वस्थ झाला. या अस्वस्थतेतूनच त्याने १० आॅगस्ट २०१६ रोजी थेट पंतप्रधानांचे तक्रार निवारण पोर्टल म्हणजे ‘प्राइम मिनिस्टर ग्रिव्हिएन्स पोर्टल’वर तक्रार नोंदवली. या पोर्टलवरून ही तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत जिन्सी पोलीस ठाण्यात आली. दरम्यान, मोहितने मोबाइलमधील ट्रॅकरच्या साहाय्याने आपला मोबाइल शोधला व मिळवलाही. मोहित नावंदरला जिन्सी पोलिसांनी ठाण्यात बोलावण्याचा प्रयत्न केला; पण मी आता औरंगाबादमध्ये राहत नाही व माझा मोबाइल मला मिळाला आहे, असे त्याने कळवून टाकले; मात्र ‘प्राइम मिनिस्टर ग्रिव्हिएन्स पोर्टल’वरून मेल व फोनने पाठपुरावा सुरूच होता. त्यामुळे जिन्सी पोलिसांना अहवाल पाठवणे गरजेचे होते, म्हणून मोहितने समक्ष येऊन जबाब नोंदवावा, अशी विनंती जिन्सी पोलीस करीत होते; पण मी येऊ शकत नाही, असे मोहितने स्पष्ट केले; मात्र यावर मग ‘निदान मोबाइल मिळाला एवढा निरोप तरी प्राइम मिनिस्टरसाहेबांना द्या’ अशी विनवणी पोलिसांना करावी लागली.
अरे बाबा, मोबाइल मिळाला म्हणून पीएमसाहेबांना मेल कर
By admin | Published: July 16, 2017 12:32 AM