- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस अनेक कारणांनी श्रवणदोषांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: सतत हेडफोन, इयरफोनने तरुणांना बहिरेपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नियमित हेडफोन, इयरफोन वापरणाऱ्या १० पैकी २ तरुणांना श्रवणदोष येत असल्याचे निरीक्षण घाटीतील डाॅक्टरांनी नोंदविले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आठवड्यातून ४ दिवस होणारी कान-नाक-घसा विभागाची ओपीडी आता दररोज होत आहे. इतकेच काय आठवड्यातून तीनच दिवस होणाऱ्या शस्त्रक्रियाही आता दररोज होऊ लागल्या आहेत.
बहिरेपणा आणि श्रवण दोष कमी करण्यासाठी घ्यायची दक्षता, तसेच कानाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ३ मार्चला 'जागतिक श्रवण दिन' साजरा केला जातो. घाटीतील कान-नाक-घसा विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. प्रशांत केचे म्हणाले, दररोज ओपीडीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के रुग्ण कानाशी संबंधीत आजारांचे असतात. एक दिवसाच्या शिशूंपासून ज्येष्ठांपर्यंत श्रवणदोष आढळतो. सहायक प्राध्यापक डाॅ. शैलेश निकम म्हणाले, कानाची नस कमजोर झाल्याने, कान फुटणे, वाहणे, जन्मत: बहिरेपणा, हेडफोन वापरामुळे श्रवणदोष निर्माण झालेले रुग्ण उपचारासाठी येतात.
ऑडिओलाॅजिस्ट डाॅ. प्रिया गुप्ता म्हणाल्या, विभागातील ऑडिओलाॅजी क्लिनिकच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने कर्णदोषाचे निदान करून उपचाराची पुढील दिशा ठरवली जाते. खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात, परंतु घाटीत अगदी स्वस्तात, शासकीय शुल्कात विविध तपासण्या होतात. विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख म्हणाले, अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारीपासून ओपीडीत दररोज रुग्णसेवा दिली जात आहे. शस्त्रक्रियादेखील आता दररोज होत आहे.
अशी आहे परिस्थितीकान-नाक-घसा विभागाची रोजची ओपीडी- १०० ते १२५ओपीडीत कानाशी संबंधीत येणारे रुग्ण- ५० टक्केरोज होणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रिया- ५ ते ६रोज होणाऱ्या छोट्या शस्त्रक्रिया- ७ ते ८
असे जपा कानाचे आरोग्य..सतत हेडफोन, इयरफोन वापरू नये. कानांना पुरेशी विश्रांती द्यावी. मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करताना बहिरेपणा आल्याची समस्या घेऊन महिन्याला किमान २ ते ३ कामगार घाटीत येतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी श्रवण संरक्षण उपकरण वापरले पाहिजे. सतत सर्दी, खोकला होत असेल तर वेळीच उपचार घ्यावा. जन्मत: बहिरेपणावर वेळीच उपचार घेतल्यास मुले ऐकू शकतात, त्यातून ते बोलू शकतात. कानात काडी, टोकदार वस्तू टाकता कामा नये.