औरंगाबाद : जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे १७ सप्टेंबर रोजी उपहासात्मक पुष्पवृष्टी करून स्वागत करणार आहेत. त्यांच्या या उपहासाचा शिवसेनेने समाचार घेतला असून त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. खा. जलील आपण २०१५ पासून सलगपणे हैदराबाद मुक्तिसंग्राम सोहळ्याला उपस्थित राहात आलात. या भूमीप्रति ज्या निष्ठेने आपण उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करता, हे अभिनंदनीयच नव्हे तर गौरवपूर्ण आहे. यासाठी आधी त्यांचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त करीत शिवसेनेने त्यांना शालजोडे लगावले आहेत. तुमचे स्वागत करणे कुणाला आवडणार नाही? त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची घाई न करता अगोदर आमच्या स्वागताचा स्वीकार करावा, असे शिवसेनेने पत्रात म्हटले आहे.
शिवसेनेचे विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी साेशल मीडियातून व्हायरल केलेल्या एका पत्रात म्हटले आहे, खा. जलील आपल्याला एक पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस आम्ही करणार आहोत. आपल्या धडाडीच्या कामाने अवघा मुलूख स्तंभित झाला आहे, औकाफ (वक्फ) बोर्डाच्या जमिनींमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या भू-माफियांना आपण ज्या पद्धतीने जेरबंद केले त्यातूनच तुमचा जो करिष्मा दिसतो तो दखलणीय. तसेच गेल्या काही दिवसांपासून आपण गुटख्याविरोधात मोहीम उघडली. त्यामुळे शहरातून गुटखा हद्दपार झालाय. इतकेच नाही तर मध्यंतरीच्या काळात अवैध दारूचे सगळे अड्डे आपण बंद करून मोठे समाजकार्य केले. तमाम युवापिढीचे आपण हिरो झालात. विधानसभा सदस्य या नात्याने आपण केलेल्या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे. आपल्या नियोजनपूर्वक विकासकामांमुळे आपले कार्यक्षेत्र आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला आले आहे.
आता खासदार म्हणून आपला ठसा उमटलाय. अल्पावधीत आपण संपूर्ण मतदारसंघ विकास कामांनी आणि विकास योजनांनी गजबजून टाकलाय. मतदारसंघातील १३०० हून अधिक गावांची भूमी आपल्या स्पर्शाने पावन झाली. आपल्या पदस्पर्शाने विकासगंगा अवतरल्याचे वृत्त नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत आहे. आपण आमदार आणि खासदार म्हणून केलेल्या अनेक मूलभूत कामांकडे बघून कुणीही थक्क होईल.
आपल्या २५ नगरसेवकांनी तर सगळे वॉर्ड समस्यामुक्त केलेत
महापालिकेच्या माध्यमातून आपल्या २५ नगरसेवकांनी त्यांचे वॉर्ड समस्यामुक्त केले असून त्याची प्रचिती या भागातून जाता-येता येते. आपल्या पक्षाच्या सदस्यांनी मनपा सभागृहात शालीनता-अदब आणि संस्कारांचे प्रदर्शन घडवीत एक इतिहास घडविला. हे संपूर्ण औरंगाबादकरांनी पाहिले आहे. मुक्तिसंग्रामदिनी आपण येऊन ध्वजवंदन करून हैदराबाद मुक्तीच्या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना दरवर्षीच्या रीतीनुसार अभिवादन करावे.