नांदेड : मृक्ष नक्षत्रात पावसाने दडी मारली, आता आर्द्राला प्रारंभ झाला.आर्द्रात तरी पाऊस येणार की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे अरे पावसा, पावसा, तु आहेस तरी कुठे? असा सवाल सर्वांच्याच तोंडून ऐकावयास मिळत आहे. पळसा : ऐन मोक्यावर पावसाने दांडी मारल्यामुळे खरिपाची पेरणी ही लांबणीवर जात आहे. खरिपाच्या पेरणीसाठी साधारणत: १० जून ते २० जूनचा कालावधी हा सर्वोत्तम मानला जातो. परंतु यंदा मृग नक्षत्रात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने खरिपाचा हंगाम लांबणीवर जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यातच बी-बियाणे, खते यांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे शोतकरी अगोदरच चिंतेत दिसून येत आहेत.मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटी दमदार पाऊस झाल्याने २० जूनपर्यंत ८० टक्के पेरणी आटोपली होती व जून महिन्याच्या शेवटी शेवटी पिके राणात डोलायला लागली होती. मागील वर्षी सोयाबीनचा पेरा अधिक होता. परंतु यावर्षी कापसाचा पेरा वाढण्याची श्क्यता वर्तविली जात आहे. मागील वर्षीसारखा दुबार पेरणीचे संकट आले तर? या विचाराणे संभाव्य धोका लक्षात घेवून शेतकरी यंदा पेरणी करण्यापूर्वी दहादा विचार करीत आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने आधिच व्यक्त केला. मृग नक्षत्र लागूनही पाऊस येण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पुरेशा सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी सुद्धा पेरणी करायची की नाही याबाबत आशंका आहेत. मागील वर्षी संततधार पावसामुळे तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. शिवाय बाजारपेठेतही शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असताना यावर्षी सुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ झालेली दिसून येत आहे. पाऊस लांबल्याने कामे ठप्पनिवघा बाजार : मृग नक्षत्र संपूनही निवघा बाजार परिसरात वरूणराजा बरसला नसल्याने कामे ठप्प झाली़ मजुरांच्या हाताला कामे मिळत नसल्याने मजूर कामाच्या शोधात आहेत़ अद्याप परिसरात पावसाची एकही सरी कोसळली नाही़ पाऊस कधी पडेल याचा काही नेम नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशगती झपाट्याने आटोपल्या असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे़ मात्र पाऊसच पडत नसल्याने पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ शेतकऱ्यांची शेतीकामे पूर्ण आटोपल्याने मजुरांना कामे राहिली नाहीत, यामुळे मजूर कामाच्या शोधात असून पावसाची पण प्रतीक्षा करीत आहेत़ पाऊस पडला तर पेरणीची कामे सुरू होतील़ यामुळे शेतात काम करण्यासाठी मजुरांना कामे मिळतील म्हणून शेतकऱ्यांबरोबरच मजुरांनाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत़ तर शेतीकामेही ठप्प झाली आहेत़ शेतकरी सावकारी विळख्यातपळसा : मागील वर्षी खरीप अतिवृष्टीने तर रबी हंगाम गारपिटीने उद्धवस्त झालेला बळीराजा यावर्षी पुन्हा उभा राहून खरिपाच्या तयारीला लागला आहे़ परंतु जवळ एक छदामही नसल्या कारणाने लागवडीच्या पैशासाठी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत़ शेती, सोन्या-चांदीसह जनावरे गहाण ठेवून दरमहा १० टक्के दराने व्याज खुलेआम सावकारी सुरू आहे. पळसा परिसरात चेंडकापूर, किन्हाळा, गारगव्हाण, पिंगळी, लिंबटोक आदी गावे असून लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे़ परंतु सततची नापिकी व शेतमालांचे अल्प दर, तर कधी अतिवृष्टी, गारपीट आदींचा तडाखा शेतकऱ्यास बसत आहे़ यंदा तर खरीप व रबी दोन्ही हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या पुरता वैतागला आहे़ आता लावलागवडीसाठी बी-बियाणे व खते खरेदीसाठी पैसे नसल्याने सावकाराकडून कर्ज काढावे लागत आहे़ परिसरात अनेक गावात सावकार व दलाल सक्रिय झाले आहेत़ कोणाला पैसे लागलयास दलालाच्या माध्यमातून सावकार पैसे उपलब्ध करून देत आहेत़ शेतकऱ्यास पैसे हवे असल्यास शेतीची पक्की खरेदी करून पैसे दिले जात आहे़ दरमहा ५ ते १० टक्के व्याज दराने पैसे घेत असताना संभाव्य धोका लक्षात येत असून सुद्धा केवळ नाईलाजाने शेतकऱ्यांना धोका पत्करावा लागत आहे़ शेतीबरोबर स्थानिक सोनाराला हाताशी धरून सोने, चांदी गहाण ठेवून पैसे उपलब्ध करून दिले जातात़ सोन्याच्या अर्ध्या किंमतीची रक्कम सोने गहाण ठेवून सावकार देतो़ या सावकारीत सावकार मात्र बिनधास्त असतो़ पैसे परत केले नाही तर त्यांचे सोने हे जिरविले जाते़ कमी रक्कम हवी असल्यास शेतकरी आपल्याकडील जनावरेसुद्धा गहाण ठेवून पैसे मिळवितो़ यासाठी जनावरं गहाण ठेवून ग्रामपंचायतीचे विक्री वाहतूक प्रमाणपत्र, त्यांच्याकडून घेतले जाते़ एकदा असे प्रमाणपत्र सावकाराला दिले की जनावरांची विक्री करता येत नाही़ त्यामुळे सावकार कधीही जनावरे ओढत नेवून बाजारात विकत नेवू शकतो़ गतवर्षी ३०८ यंदा केवळ २३ मि.मी. पाऊसकिनवट : मृगनक्षत्र संपूनही पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ २३ जूनपर्यंत केवळ २३ मि़ मी़ पावसाची नोंद झाली. २००६ ची पुनरावृत्ती झाल्याचे पाऊस नोंदीवरून दिसून येते़ गतवर्षी तालुक्यात ३०८ मि़ मी़ इतक्या पावसाची नोंद तर झाली होती, शिवाय ८० ते ९० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या़ १७ जूनच्या पावसाच्या भरवशावर केलेल्या धूळ व पूर्व हंगाम ३० टक्के पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत़ तालुक्यात खरीप हंगामासाठी ७९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असून पावसाने डोळे वटारले असतानाही पूर्वहंगामी व धूळ अशा ३० टक्के पेरण्या आजपर्यंत पूर्ण झाल्या़ गतवर्षी याच पेरण्या ८० ते ९० टक्के झाल्या होत्या़ २३ जूनपर्यंत केवळ २३ मि़ मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ २३ जून २००६ पर्यंत १८ मि़ मी़ इतक्या पावसाची नोंद झाली होती़ २००९ ला २१ मि़ मी़ तर २०१० ला ४० मि़ मी़ या तीन वर्षाची पुनरावृत्ती झाल्याचे पाऊस नोंदीवरून दिसून येते़धर्माबादकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षाधर्माबाद : मशागत पूर्ण करून बी-बियाणे खरेदी करून शेतकरी आता आराम करत घरी बसला, पण त्याचे डोळे आकाशाकडे लागले असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे़ शेतातील वखरणी, केरकचरा वेचून जमीन भुसभुुशीत करून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे़ गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस उशिरा हजेरी लावत असल्यामुळे पेरणीसुद्धा उशिरा होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे़ बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने मशागत केली आहे़ काही शेतकऱ्यांनी बैलजोडीने मशागत पूर्ण केली़ या महागाईच्या काळात कसेबसे शेतकरी उधारी का होईना कृषी केंद्रावर बी-बियाणे खरेदी करीत आहेत़ बी-बियाणे खरेदी करून शेतकरी घरी आराम करीत बसला असून आता फक्त मोठ्या पावसाची प्रतीक्षा तो करीत आहे़ परवाच्या रिमझिम पावसाने दहा टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे़ पावसाने पाठ फिरवल्याने लागवड केलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़
अरे पावसा, पावसा तु आहेस तरी कुठं ?
By admin | Published: June 24, 2014 12:35 AM