छत्रपती संभाजीनगर : शहरातील स्मशानभूमीची अवस्था ‘जैसे थे’च असून, ती दिवसेंदिवस अधिक बकाल होते आहे. स्मशानभूमींकडे जाणारे मार्ग खडतर बनले आहेत. भावसिंगपुरा स्मशानभूमीच्या रस्त्याने तर स्वर्गरथ कसा न्यावा? असा प्रश्न नागरिकांना पडतो.
दोन दिवसांपूर्वी शहरात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलच चिखल झाला. दुचाकी, चारचाकी वाहनांचे चाक किमान दोन फूट चिखलात अडकत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती असते. महापालिकेला अनेकदा विनंती करूनही आजपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले नाही. दीडशे कोटी, शंभर कोटींचे अनेक पॅकेज केले. त्यात अत्यावश्यक रस्त्यांचा समावेश केला नाही. लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील रस्त्यांची निवड केल्याचा आरोप या भागातील नागरिक करीत आहेत.
स्मार्ट सिटीचे काम सुरू; पण...चार महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटीने रस्त्याच्या कामाची सुरुवात केली. कंत्राटदाराने रस्ता खोदला आणि काम संथगतीने सुरू केले. त्यामुळे वाहनस्वारांचा मनस्ताप अधिकच वाढला आहे. रस्त्यासाठी सुमारे ६ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्यावर दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. वाहतुकीसाठी दुसरा मार्ग नसल्याने चिखलमय रस्त्याशिवाय पर्याय नाही. रात्री अंत्ययात्रा नेताना ठेचाळतच जावे लागते. या भागात मोकाट श्वानांचा देखील मोठा सुळसुळाट आहे. भीमनगर, भावसिंगपुरा, नंदवन कॉलनी, पेठेनगर व अन्य परिसरातील नागरिकांना याच रस्त्यावरील एकमेव स्मशानभूमी असून, अंत्यविधीसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व स्मशानभूमी उच्च दर्जाच्या असाव्यात, स्मशानभूमीत पाय ठेवल्यानंतर नागरिकांना भीती नव्हे, दिलासा मिळावा असे काम करायला हवे, असे विचार काही महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने व्यक्त केले होते, त्याचे पुढे काय झाले, याची कुणालाच माहिती नाही.
लोकमतचा पाठपुरावा अन्...शहरातील सर्वांत मोठी स्मशानभूमी म्हणजे कैलासनगर स्मशानभूमीकडे पाहिले जाते. येथील रस्त्याची अवस्थाही अत्यंत विदारक आहे. स्वर्गरथ तर सोडा खांद्यावर मृतदेह नेणेसुद्धा अवघड बनले होते. ‘लोकमत’ने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताच दुसऱ्याच दिवशी मनपा, स्मार्ट सिटीने रस्त्याचे काम सुरू केले. अजूनही रस्त्याचे काम अर्धवट आहे. मात्र, स्मशानभूमीपर्यंत तरी स्वर्गरथ कसाबसा नेता येतो.