छत्रपती संभाजीनगर / लाडसावंगी : दररोज सकाळी आकाशातून विमान जाते. परंतु, सोमवारी अचानक विमान इतक्या घिरट्या का मारत आहे, काय झाले या विमानाला? अशी चर्चा सोमवारी सकाळी लाडसावंगी परिसरात रंगली. लँडिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या एअर इंडियाच्या दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमानाने लाडसावंगी परिसरात आकाशात अनेक घिरट्या मारल्या. त्यातूनच परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली.
लाडसावंगी गावावर सोमवारी सकाळी ६:३० ते ७ वाजेदरम्यान एकाच विमानाने आठ ते दहा घिरट्या घातल्या. त्यामुळे याविषयी एकमेकांना नागरिकांनी विचारणा सुरू केली. दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी या तीन वेळात चिकलठाणा विमानतळावर उतरणारे विमान लाडसावंगी गावावरून जाते. मात्र, सोमवारी सकाळी एकच विमान लाडसावंगी परिसरात गोल-गोल फिरू लागले. या विमानाने काही वेळातच आठ ते दहा घिरट्या घातल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री-अपरात्री ड्रोन फिरत आहे. ते नेमके कशामुळे फिरत आहे, याचा उलगडा झाला नाही. त्यात विमानाने घिरट्या मारल्यामुळे लाडसावंगी परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. लाडसावंगी येथील काही नागरिकांनी चिकलठाणा विमानतळाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते फोन घेत नव्हते, असे काही नागरिकांनी सांगितले.
का मारल्या घिरट्या?सकाळच्या वेळेतील इंडिगोचे मुंबई विमान टेक ऑफच्या तयारीत होते. त्याच वेळेस एअर इंडियाचे दिल्लीचे विमान दाखल झाले. त्यामुळे दिल्लीच्या विमानाला काही वेळेसाठी आकाशात घिरट्या माराव्या लागल्या, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.