छत्रपती संभाजीनगर : यंदा बारावीच्या परीक्षेत काॅपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाला. उस्मानपुरा भागात नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने गणिताचा पेपर अवघड चालल्यामुळे त्याने चक्क उत्तपत्रिका घेऊनच परीक्षा कक्षातून धूम ठोकली. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या पर्यवेक्षकाने केंद्रसंचालकांमार्फत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्याला एका खाजगी अभ्यासिकेतून पकडून आणले.
झाले असे की, शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता. देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पेपर उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांच्या कक्षात होता. पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेली उत्तरपत्रिका कक्षातील सर्व विद्यार्थ्यांना वाटप केल्या. त्यानंतर या विद्याथ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई उसवली व त्यातील १३, १४, १५ आणि १६ या क्रमांकाची पाने व प्रश्नपत्रिका बेंचवर ठेवून तो लघुशंकेसाठी म्हणून बाहेर गेला. त्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरुन उडी मारून परीक्षा केंद्रातूनच बाहेर पळ काढला.
बराचवेळ झाला तरी तो परत आला नाही म्हणून सहज पर्यवेक्षकाने त्याच्या बेंचवर जाऊन पाहिले तेव्हा हा प्रकार समोर आला. ही बाब त्यांनी तात्काळ केंद्र संचालकांना कळविली. केंद्र संचालकांनी वेदांतनगर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी केंद्र व परिसरात त्याचा बराच शोध घेतला. पण, तो सापडला नाही. अखेर त्याच कक्षात परीक्षा देत असलेल्या त्याच्या मित्राकडे चौकशी केली. तेव्हा तो देवगिरी कॉलेज जवळ खाजगी अभ्यासिकेत गेलेला असावा, असा अंदाज त्याने वर्तवला. पोलिस तेथे गेले व त्याला पकडून आणले. मात्र, आपण उतरपत्रिका नेलेलीच नाही, यावर तो ठाम राहिला. शेवटी त्याचे वडिल केंद्रात आले. तेव्हा मात्र, त्याने वडिलांना सोबत नेलेली उत्तरपत्रिका कोठे ठेवली ते सांगितले.