औरंगाबाद : पोलीस चालक भरती परीक्षेत एमआयटी येथील परीक्षा केंद्रावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडल्या गेला. चिकलठाणा येथील केंद्रावर एका परीक्षार्थीला टेक्नॉलॉजीचा वापर करून कॉपी (नक्कल) करताना रंगेहाथ पकडले. या दोन्ही प्रकरणांत सातारा व एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस चालक भरती प्रक्रियेसाठी शहरातील दहा केंद्रांवर लेखी परीक्षेेचे आयोजन बुधवारी सकाळी १० ते ११.३० वाजे दरम्यान करण्यात आले होते. यात ३ हजार ३६० विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. एमआयटी महाविद्यालयातील केंद्रावर पोलीस उपनिरीक्षक एस. शिरसाठ, अनिता फासाटे, शिपाई के.एच. खिल्लारे, सुरेश चव्हाण, मंगेश जाधव, गोपाल देठे आणि सुचित्रा देव कार्यरत होते. प्रत्येक परीक्षार्थीचे ओळखपत्र, आधार कार्ड पाहूनच आतमध्ये सोडण्यात येत होते. ९ वाजून ४५ मिनिटांनी एक अल्पवयीन मुलगी धावत प्रवेशद्वारावर आली. तिला नाव विचारले असता पूजा दिवेकर असे सांगितले. मात्र तिच्या हॉलतिकीटवरील छायाचित्र वेगळेच दिसत होते.
विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने पूजा रामदास दिवेकर (रा. स्वामी विवेकानंदनगर, एन १२, हडको) या परीक्षार्थीच्या नावावर परीक्षा देण्यास आले असल्याचे सांगितले. तसेच यासाठी तिला रणजीत राजुपत (बहुरे) (रा. शेकटा, ता. औरंगाबाद) हा मदत करीत असून, पैसे देणार होता. तोतया परीक्षार्थीचा भंडाफोड झाल्यानंतर उपनिरीक्षक फासाटे यांनी त्या अल्पवयीन मुलीची अंगझडती घेतली असता, तिच्याकडे मोबाइल, मायक्रो माईक, स्पाय डिवाइस, ब्ल्यूटुथ डिवाइस, बोगस कलर आधार कार्ड आढळून आले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीसह मूळ परीक्षार्थी पूजा दिवेकर, रणजी राजपूत यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अत्याधुनिक साधनांतून कॉपीचिकलठाणा येथील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर राहुल मदन राठोड (वय २३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) हा परीक्षार्थी मोबाइल, मास्टर कार्ड ब्ल्यूटुथ कनेक्टर डिव्हाईस, ब्ल्यूटुथ मख्खी एअर फोन असे साहित्य आढळून आले. परीक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक व्ही.एस. पोटे, उपनिरीक्षक अमरनाथ नांगरे, एस.बी. मांटे, दिनकर सोनगिरे यांच्यासह इतरांनी या परीक्षार्थीस पकडले. त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.