औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत हायकोर्ट वकील आणि कॅन पॅक संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ललन कुमार आणि सुनील भोसले सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ड संघाविरुद्ध कॅन पॅकने २0 षटकांत ३ बाद १४८ धावा केल्या. त्यांच्याकडून गणेश खेडकरने ५ चौकारांसह ४५ व सी.पी. राघवन याने एक षटकार व ४ चौकारांसह ४३, केदार काळेने २१ व वसीमने १२ चेंडूंत ३ षटकारांसह २५ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी ड संघाकडून शेख सोहेल व मोहतेशीन खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी ड संघ ८ बाद १३0 धावाच करू शकला. त्यांच्याकडून शेख सोहेलने ४ चौकार व ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. कॅन पॅक संघाकडून ललन कुमार याने २0 धावांत ४ गडी बाद केले. वसीमने २, तर केदार काळेने १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात हायकोर्ट वकील संघाने जिल्हा वकील कनिष्ठ संघाविरुद्ध ६ बाद २0६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सुनील भोसलेने ३३ चेंडूंतच ६ षटकार व ४ चौकारांसह ७२, संदीप सहानीने ३ षटकार व ७ चौकारांसह ७२ धावा केल्या. ज्ञानेश्वर पाटीलने २८ व मनोज शिंदेने २0 धावा केल्या. जिल्हा वकील संघाकडून कीर्तीकुमार राणाने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ ११० धावांत गारद झाला. त्यांच्याकडून कीर्तीकुमार राणाने ४ चौकारांसह ४0 व जयराज आव्हाडने २२ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून अमित वायकोस, सय्यद जावेद यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.तत्पूर्वी, महाराष्ट्र रणजी संघाचा माजी कर्णधार मिलिंद गुंजाळच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी एम.जी.एम.चे विश्वस्त डॉ. प्रवीण सूर्यवंशी, संजय चिंचोलीकर, डॉ. गिरीश गाडेकर, मंडळाचे अध्यक्ष उद्धव भवलकर, एस.डी. पाटील, सुनील भोसल, दामोदर मानकापे, प्रभूलाल पटेल, महेंद्रसिंग कानसा, अनिरुद्ध पुजारी, अभिनव जाधव, महेश सावंत, मनीष अग्रवाल, सागर शेवाळे, संदीप दत्त, सय्यद जमशेद गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते.
हायकोर्ट वकील, कॅन पॅक संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:00 AM