औरंगाबाद : शासनाच्या इनामी जमिनीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे व ती जमीन जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचे सकृत्दर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी सोमवारी दिले.
तक्रारदार राजाभाऊ फड (रत्नाकर गुट्टे यांचे जावई) यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. फड यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी १९९१ मध्ये जगमित्र शुगर फॅक्ट्री प्रा.लि.साठी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पूस येथील जमीन खरेदी केली होती. ही जमीन बेलकुंडी मठाला इनाम दिलेली होती. मठाचे पूर्वीचे महंत रणजित व्यंकागिरी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांनी जमिनीवर स्वत:च्या मालकीची परस्पर नोंद करून घेऊन त्या जमिनी विकल्या. न्यायालयात वेगवेगळे दावे दाखल करून ती जमीन स्वत:ची असल्याबाबत हुकूमनामे करून घेतले. याची शासनाला कल्पनाही नव्हती. धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे सदर जमिनी खरेदी केल्या आणि ‘बिगरशेती’ करून घेतल्या.
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर जमीन शासनाची असल्यामुळे शासनाला फसविण्याच्या हेतूने जमिनीची परस्पर विल्हेवाट लावली. सरकार दप्तरी मालक असल्याच्या नोंदी लावून घेतल्या. ही शासनाची फसवणूक आणि भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा होतो. ही जमीन शासनाची असल्यामुळे शासनाशिवाय कोणीही ती परस्पर हस्तांतरित करू शकत नाही. तक्रारदाराने फिर्याद देऊनही राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल झाला नाही. म्हणून त्यांनी अॅड. विजयकुमार डी. सपकाळ यांच्यामार्फत या खरेदी व्यवहाराविरोधात बदार्पूर पोलीस ठाण्यात फड यांनी तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे. गिरी, देशमुख व चव्हाण यांच्यात जमिनीवरून वाद होता. जमिनीच्या विक्रीचे अधिकार देशमुख व चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही जमीन खरेदी केली होती. पोलीस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम मुंडे व इतर अशा एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याचा तपास करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांने केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. या प्रकरणात शासनातर्फे सहायक सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.
सूडबुद्धीतून तक्रारीमुंडे यांच्या वतीने मुंबईत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कुणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांना व बँकांना ५४०० कोटी रुपयांना बुडविणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई राजाभाऊ फड यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरुद्ध तक्रार दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजूने आहेत, असा दावाही मुंडे यांनी केला आहे.
जमीन हडपणारा विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीला कसा चालतो? - धसभाजप नेते अमित शहांना तडीपार म्हणून हिणवणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला व त्यांच्या नेत्यांना अनेक शेतकऱ्यांची जमीन लुबाडणारा, सरकारी जमीन हडपणारा, मयताची जमीन बळकावणारा, जिल्हा बँक देशोधडीला लावून जप्ती आलेला विरोधी पक्षनेता कसा काय चालतो असा सवाल आ.सुरेश धस यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार १९९१ साली सदर जमीन देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्गाने विकत घेतली आहे. त्यावेळी रेकॉर्डवर ही जमीन शासनाची किंवा न्यासाची असल्याची कुठलीही नोंद नव्हती. उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांचे वकील सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी सांगितले.