हतनूर (औरंगाबाद ) : शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहक तार मेंढ्यांच्या कळपावर पडून जवळपास ७७ मेंढ्या व ५ शेळ्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये मेंढपाळाचे ९ लाख ६० हजारांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शिवना-टाकळी प्रकल्पाच्या पायथ्याशी जैतापूर शिवारात घडली.
वैजापूर तालुक्यातील वाकला येथील कडूबा सुखदेव आयनर, संजय मांगू शिंगाडे, सदा देमा शिंदे, अंबादास देमा शिंगाडे, बाळू देमा शिंगाडे, महादू देमा शिंदे हे सहा मेंढपाळ कुटुंब जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर पंडीत झाल्टे यांच्या २९६ गट क्रमांकामध्ये रात्री वास्तव्यास होते. या सर्व मेंढपाळांच्या ८२ मेंढया एकत्रित वाघूळ ( संरक्षक) करून कळपाने बंदिस्त होत्या व शेजारी ५० फूटावर मेंढपाळ कुटुंबातील ३० जण झोपलेले असताना पहाटे वादळी वाऱ्याने शेतातून गेलेली उच्चदाबाची ११ के.व्ही.ची विद्युत तार त्या मेंढरांच्या कळपावर पडली. यात ७७ मेंढ्यांचा व ५ शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वीजवाहक तार पडल्यानंतर मेंढरांच्या कल्लोळाने मेंढपाळ जागे झाले. मात्र कळपातून आगीचे लोळ दिसू लागल्याने मेंढपाळांनी स्वत:चा जीव वाचवत शेतमालकास कळविले. शेतमालकाने हतनूर सबस्टेशनला कळवून तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केला. तोपर्यंत सर्वच्या सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. जैतापूरचे पोलीस पाटील शिवाजी केवट यांच्या माहितीवरून महसूल व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. महावितरण कडून आर्थिक भरपाई देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.