औरंगाबाद: कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी रस्त्यावरील दगडा फार्म हाऊस येथील हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली. त्यानुसार अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकास छापा मारण्याचे आदेश दिले. या छाप्यात तब्बल २५ लाख ६० हजार रुपये रोख रकमेसह १ कोटी ८१ लाख १२ हजार रुपयांचा मद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली.
शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी रस्त्यावर मनोजकुमार दगडा याचे दगडा फार्म हाऊस आहे. त्याठिकाणी शहरातील उच्चभ्रु जुगार खेळत असल्याची माहिती अधीक्षक कलवानिया यांनी मिळाली होती. त्यानुसार कन्नडचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, एलसीबीचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या पथकांनी मंगळवारी पहाटे ३.३० वाजता फार्म हाऊसवर छापा मारला. तेव्हा पहिल्या मजल्यावरील गॅलरीत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या पुनमसिंग सुनील ठाकुर (३३, रा. रांजगणाव शेणपुंजी), गणेश रावसाहेब पोटे (२८, रा. नागेश्वरवाडी), कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल (३७, रा. शहागंज), अभिषेक वसंतकुमार गांधी (३६, रा. चिकलठाणा), संदीप सुधीर लिंगायत (४७, रा. बन्सीलालनगर), विशाल सुरेश परदेशी (३३, रा. पदमपुरा) आणि फार्म हाऊसचा मालक मनोजकुमार फुलचंद दगडा (४६, रा. सिडको, एन ९, छायानगर) यांना पकडले. या सात जणांच्या ताब्यातुन तब्बल २५ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम सापडली. त्याशिवाय पाच चारचाकी वाहने, ७ मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकुण १ कोटी ८१ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, एलसीबीचे रेंगे, उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, गणेश गांगवे, विजय धुमाळ, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे आणि आनंद घाटेश्वर यांच्या पथकाने केली. या प्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.,
आतापर्यंतची सर्वाधिक रोख रक्कमजुगार अड्ड्यांवर मारलेल्या छाप्प्यांमध्ये ग्रामीण हद्दीतील आतापर्यंत सर्वाधिक रोख रक्कम दगडा फार्म हाऊसच्या छाप्यात ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. अनेक जुगार अड्डयांवर एवढ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवण्यात येत नाही. मात्र जुगार खेळणारे शहरातील नामांकित व्यवसायिक असल्यामुळे एवढ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन् खेळत असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.
अनेक दिवसांपासून सुुरू होता अड्डादगडा फार्म हाऊसवर अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. शहरातील नामांकित जुगार अड्डे काही दिवसांपुर्वी बंद झाल्यामुळे जुगाऱ्यांनी ग्रामीण भागाकडे ओढा वाढल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ग्रामीण हद्दीतही पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर छापे मारण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्यामुळे अवैधधंद्यावाल्याच्या अडचणी वाढल्या आहेत.