लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त सलग दहाव्या वर्षीही जमात-ए-इस्लामी हिंदच्या युथविंगतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. शहरात तीन वेगवेगळ्या भागांत घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये रक्तदानाचा एक नवीन उच्चांक निर्माण झाला.दिवसभरात तब्बल ७६५ दात्यांनी रक्तदान केले. रात्री उशिरापर्यंत युनूस कॉलनी येथील कार्यालयात रक्तदानासाठी रांगा लागलेल्या होत्या.शनिवारी सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत तीन ठिकाणी महारक्तदान शिबीर घेण्यात आले. टाऊन हॉल भागातील लाल मशीद, युनूस कॉलनी आणि पैठणगेट या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले होते.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी युथ विंगचे अध्यक्ष शेख अजहर, शेख फहीम, शेख तौसीफ यांच्यासह जमात-ए-इस्लामी हिंदच्या तिन्ही विभागाचे अध्यक्ष डॉ. इम्रान अहेमद खान, अब्दुल वाजेद कादरी, वाजीद अली खान, शहर संयोजक इलियास खान फलाही यांची प्रमुख उपस्थिती होती.पैठणगेट, टाऊन हॉल आणि युनूस कॉलनी येथे सकाळपासून रक्तदानासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. रक्तदानासाठी तरुणांसह सर्वसामान्यांनीही गर्दी केली होती.घाटी रुग्णालयात मराठवाड्याशिवाय इतर जिल्ह्यांतून रुग्ण मोठ्या संख्येने येतात. रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते.मानवी सेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून जमात-ए-इस्लामी हिंदने २००७ पासून या स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला अत्यंत छोटेखानी स्वरूपात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दरवर्षी याचा व्याप वाढविण्यात आला. औरंगाबादकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्द प्रतिसाददिला.दरवर्षी रक्तदात्यांची संख्या वाढतच आहे. यंदा महारक्तदान शिबिराने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. यंदा रक्तदानाचा सर्वोच्च आकडा गाठण्यात यश आल्याचे आदिल मदनी यांनी सांगितले.
महारक्तदान शिबिरात रक्तदानाने गाठला उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:27 AM