सिल्लोड: तालुक्यातील धानोरा सर्कलमध्ये दररोज सायंकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वीज जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. यामुळे धानोरा गावातील १०० ग्रामस्थ बुधवारी रात्री १२ वाजता अचानक भराडी येथील सबस्टेशनमध्ये धडकले. विजेचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा, हायव्होल्टेज वाहिनीला पकडू, असा इशारा दिला. अचानक झालेल्या या अनोख्या आंदोलनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विजेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
गेल्या दोन वर्षापासून दररोज वीज जात असल्याने धानोरा गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मेटकुटीला आले होते. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी टोकाचा निर्णय घेत महावितरणच्या भराडी येथील सबस्टेशनमध्ये मध्यरात्री १२ वाजता धडक दिली. वीज द्या, अन्यथा हायव्होल्टेज वाहिनीला पकडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने मुख्य अभियंता एम. एस. मस्के यांनी विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावतो असे आश्वासन दिले. यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानुसार आज, गुरुवारी महावितरणने युद्ध पातळीवर काम करत १५० नवीन पोल मागवून घेत नवीन लाईन जोडण्याचं काम चालू केले. या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवून हा विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावला जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यानी सांगितले.
या आंदोलनात राधाकृष्ण पाटील काकडे, रघुनाथ पांडव, अक्षय पाटील ,स्वप्नील दवणे, संजय नाकीरे, प्रताप मिरगे ,दत्ता काकडे, सुनील काकडे ,अविनाश विसपुते, भगवान काकडे, पवन काकडे, सोमीनाथ काकडे ,प्रकाश काकडे ,हरिभाऊ काकडे ,गजानन खंबाट, भिकंदोड काकडे, सुदाम काकडे सहित मोठ्या प्रमाणात धावडा, धानोरा येथील ग्रामस्थांचा सहभाग होता.