औरंगाबाद : भारतातील उच्च शिक्षणामध्ये सर्वत्र कॉर्पोरेट कल्चरचा आग्रह धरण्यात येत आहे. हा आग्रह केवळ नफ्यासाठी धरण्यात येत आहे. हा नफा कमावण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन असणार्या व्यक्तींचीच नेमणूक कुलगुरू, कुलसचिवांसह इतर पदांवर होत असल्याचे प्रतिपादन प्रा. आर. रामकुमार यांनी केले.
स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) तर्फे दुसरे राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी संमेलन मौलाना आझाद संशोधन केंद्रात शुक्रवारी आयोजित केले होते. या संमेलनाचे उद्घाटन टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसमधील प्रा. आर. रामकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर एसएफआयचे अखिल भारतीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, अखिल भारतीय सचिव विक्रमसिंग, राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सचिव बालाजी कलेटवाड, संयोजक अॅड. सुनील राठोड, नितीन वाहुळे, मंजूश्री कबाडे, सोमनाथ निर्मळ, रोहिदास जाधव, अनिल मिसाळ, सचिन खडके उपस्थित होते.
उद्घाटनानंतर प्रा. आर. रामकुमार यांनी मार्गदर्शन केले. भारतातील उच्च शिक्षणाची स्थिती दोलायमान बनली आहे. आजही भारतात एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ४०० डॉलर खर्च केला जातो; मात्र हेच प्रमाण इतर देशामध्ये खूप जास्त आहे. भारतातील आयआयटीमध्ये शिक्षण घेणार्या प्रतिविद्यार्थ्याला ५३ पुस्तके उपलब्ध होतात; मात्र इतर विद्यापीठांमध्ये हे प्रमाण केवळ ९ पुस्तके एवढेच अत्यल्प आहे. ही शिक्षणाची दरी सगळीकडे पाहण्यास मिळते. उच्च शिक्षण घेणार्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये मजूर, कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या मुलांची संख्याही अत्यल्प आहे. ज्यांना नोकर्या आहेत त्यांचीच मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात. ही दरी दूर झाल्याशिवाय भारताची प्रगती अशक्य असल्याचेही प्रा. आर. रामकुमार यांनी स्पष्ट केले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अॅड. सुनील राठोड यांनी केले.