औरंगाबाद : इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापकपदी नोकरी लावून देतो, अशी थाप मारून औरंगाबादेतील एका उच्चशिक्षित महिलेला १७ लाखांना गंडवणाऱ्या परेश चंद्रशेखर देशमुख या भामट्यास नाशिक येथील पंचवटी भागात सिडको पोलिसांनी गुरूवारी अटक केली. या प्रकरणातील आणखी तिघे जण फरार आहेत.
डॉ. अस्मिता शरद साळवे (३६, रा. रवीनगर, हडको एन-११) यांची मनीष माटे (रा. एन-६, विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळ, मध्यवर्ती जकातनाका) याच्याशी ओळख झाली होती. त्याने धुळ्याच्या कुसुंबा येथील नर्मदाबाई नागो चौधरी या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापकपदाची जागा रिक्त आहे. त्याठिकाणी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले होते. मनीषने नितीन चंद्रशेखर देशमुख (रा. साक्री रोड, धुळे, ह. मु. पंचवटी, नाशिक), त्याचा भाऊ परेश चंद्रशेखर देशमुख आणि त्यांची आई शकुंतलाबाई चंद्रशेखर देशमुख (दोघेही रा. सुरेंद्र डेअरीसमोर, साक्री रोड, धुळे) यांची ओळख करून दिली होती. त्यानंतर चौघांनी नोकरी देण्यासाठी काही रोख प्रमाणात, तर बँकेद्वारे डॉ. साळवे यांच्याकडून १ ऑगस्ट २०१९ पासून सप्टेंबर २००० पर्यंत १७ लाख रुपये घेतले.
एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच डॉ. साळवे यांनी या चारही भामट्यांकडे पैसे परत देण्याविषयी तगादा लावला. त्यानंतर त्यांनी १७ पैकी ९ लाख रुपये परत केले. मात्र, ८ लाख रुपये देण्यास ते सतत टाळाटाळ करु लागले. त्यामुळे साळवे यांनी गेल्या महिन्यात सिडको पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी नाशिक येथे पंचवटी भागातील बळी महाराज मंदिराजवळ असलेल्या साईसृष्टी हाऊसिंग सोसायटीतून परेश देशमुखला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी धुळ्याला नितीन आणि शकुंतला यांचा शोध घेण्यासाठी धाव घेतली; परंतु पोलीस मागावर असल्याचे कळताच परेशची आई व भाऊ भूमिगत झाले, तर मनीष माटेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.