औरंगाबाद : राजस्थानमधील जयपूर शहरातील अॅक्सिस बँकेवर दरोडा टाकून तब्बल ९२६ कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न ६ फेब्रुवारीला झाला होता. सुरक्षारक्षकामुळे लुटमारी टळली; परंतु पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली चारचाकी औरंगाबादेतील असल्याचे भासविले. राजस्थानातील गाडीचा मेकओहर करून तिला औरंगाबादच्या गाडीचा रंग व क्रमांक दिल्याचे तपासात समोर आले. सदर चारचाकी विक्रीसाठी तिचे आॅनलाईन छायाचित्र पाहून दरोडेखोरांनी ही शक्कल वापरली.
त्या दरोड्यात वापरलेल्या गाडीचा शोध घेत राजस्थानचे पोलीस औरंगाबादमध्ये पोहोचले. चार दिवसांच्या सखोल चौकशीनंतर औरंगाबादमधील गाडीच्या स्वरूपाचा गैरवापर झाल्याचे समोर आले. गुन्हे करताना पकडले जाऊ नये किंवा पोलिसांचा तपास भरकटावा, कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी गुन्हेगारही तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने कसा करतात हे यातून दिसले. जयपूरच्या अॅक्सिस बँकेवर दरोडा टाकून तब्बल ९२६ कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता. इनोव्हा गाडीतून आलेल्या १३ जणांनी बँकेच्या गेटवरील सुरक्षारक्षकाला मारहाण करीत बांधून टाकले. त्यानंतर ते भिंतीवरून उड्या मारून बँकेतील तिजोरीकडे जात होते. गेटवरील गडबड सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीताराम याच्या लक्षात आली. प्रसंगावधान राखून त्याने हवेत गोळीबार सुरू केला. या गोळीबाराने दरोडेखोर घाबरून आल्या पावली पळाले. बँकेच्या परिसरात दरोडेखोरांचे बरेच साहित्य पडले होते.
रायपूरचे पोलीस आयुक्तप्रफुल्ल कुमार यांनी तात्काळ या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष टीम तयार केल्या. पोलिसांनी जवळपासचे फुटेज तपासले. त्यामध्ये १३ आरोपी आढळून आले, तसेच अजमेर रोडवरील एका टोलवरील फुटेजमध्ये ती इनोव्हा गाडी (क्र.एमएच २१ व्ही ५७३३) दिसून आली. गाडीचा हा क्रमांक महाराष्ट्राचा असल्याने गाडीचे सर्व डिटेल्स काढून राजस्थानचे पोलीस अधिक तपासासाठी ८ फेब्रुवारी रोजी औरग्ाांबादेत दाखल झाले. यामध्ये पोलीस निरीक्षक मनीष चरणसिंग आणि एका पोलीस कर्मचार्याचा समावेश होता. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन दरोड्याच्या तपासासाठी मदत करण्याची विनंती केली. या विनंतीवरून आयुक्तांनी गुन्हे शाखेची टीम त्यांच्यासोबत दिली. या टीमने या गाडीचा शोध घेतला.
ही गाडी औरंगाबादमधील रोजाबाग येथील अंजार गौस कादरी यांच्या नावावर असल्याचे समोर आले. टीमने रोजाबागमधील अंजार कादरी यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी गाडी दारात उभी होती; मात्र दरोडा पडल्याच्या काळात ही गाडी औरंगाबामध्येच होती, असे कादरी यांनी सांगितले. पोलिसांनी त्या कालावधीतील गाडीच्या लोकेशनचा आठ ठिकाणी तपास केला. तीन ठिकाणी ही गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. यामध्ये आपतभालगाव आणि चेलीपुरा भागात तीन वेळा गाडी दिसून आली. एवढेच नव्हे, तर ज्या ठिकाणी गाडीची आठ महिन्यांपूर्वी सर्व्हिसिंग झाली त्या ठिकाणीही जाऊन चौकशी केली. त्यावेळीचे किलोमीटर आणि आताचे किलोमीटर याचीही तपासणी केली. संपूर्ण चौकशी केल्यानंतर दरोड्याच्या काळात ही गाडी औरंगाबादमध्येच होती हे निष्पन्न झाले. त्यामुळे या दरोड्याचा औरंगाबादशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आल्याने राजस्थानचे पोलीस १२ फेब्रुवारी रोजी परतले.
राजस्थानच्या पोलिसांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, पोहेकॉ नितीन मोरे, पोना शेख हकीम, पोना मनोज चव्हाण, पोना भगवान शिलोटे, पोकॉ संतोष सूर्यवंशी, पोकॉ संजय खोसरे यांनी सहकार्य केले. तपास भरकटविण्यासाठी दरोडेखोरही नाना प्रकारच्या शक्कल वापरत असल्याचे समोर आले आहे. दरोडेखोर कितीही चलाख असले तरी सीसीटीव्ही फुटेजवरून यातील सहा आरोपींना अटक करण्यात राजस्थान पोलिसांना यश आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे, असे सांगण्यात आले.
वाहनाचे तिसरे मालकही इनोव्हा गाडी (क्र. एमएच २१ व्ही. ५७३३) मूळ जालना जिल्ह्यातील एका व्यक्तीची होती. त्याने विक्रीसाठी फोटो आॅनलाईन टाकला होता. अंजार गौस यांनी आॅनलाईन पाहून गाडी खरेदी केली होती. या गाडीचे ते तिसरे मालक आहेत. आॅनलाईन फोटोचा दरोडेखोरांनी वापर केला. त्याच कंपनीची, तोच कलर असलेली आणि तेच मॉडेल असलेली गाडी घेतली. त्यावर औरंगाबादच्या गाडीचा नंबर लावला आणि दरोड्यात वापरली, असेही समोर आले.
दरोड्याशी औरंगाबादच्या गाडीचा संबंध नाहीदरोड्यातील गाडीच्या तपासासाठी राजस्थानचे पोलीस आले होते. त्यांना चौकशीसाठी सर्व मदत केली. ती गाडी दरोड्याच्या काळात औरंगाबादेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. दरोड्याशी औरंगाबादच्या गाडीचे कोणतेही कनेक्शन नाही, ही खात्री झाल्यावर राजस्थानचे पोलीस परतले, असे गुन्हेशाखचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.