औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुमारे ३५ टक्के परप्रांतीय मजूर घाबरून गावी निघून गेले आहेत. तत्पूर्वी, होळीच्या सणाला गेलेले १५ टक्के मजूर लॉकडाऊनच्या धास्तीने परत आलेच नाहीत. सध्या ५० टक्के मजूर साईटवर थोपवून धरण्यात आले असले तरी कुशल मनुष्यबळाच्या टंचाईमुळे या महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातून गेलेल्या ११२ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग’ आणि ‘लार्सन अँड टुब्रो’ (एल अँड टी) या दोन कंत्राटदार संस्था करत आहेत. जालन्यापासून माळीवाड्याच्या अलिकडे ‘मेगा’, तर ‘माळीवाड्यापासून नाशिकच्या हद्दीपर्यंत ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था काम करीत आहे. पूर्वी ‘एल अँड टी’कडे २५०० मजूर आणि ‘मेगा’कडे जवळपास ३००० मजूर काम करीत होते. सध्या ‘मेगा’कडे ९००, तर ‘एल अँड टी’कडे ७०० परप्रांतीय मजूर थोपवून धरण्यात आले आहेत. उर्वरित मजुरांपैकी १५ टक्के मजूर आधीच होळीच्या सणासाठी गावी निघून गेले होते. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. लॉकडाऊन लागेल, या भीतीपोटी ते परतलेच नाहीत. आता उर्वरित ३५ टक्के परप्रांतीय मजूर कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे गावी निघून गेले आहेत. यामध्ये कुशल व तांत्रिक मजुरांची मोठी संख्या आहे. त्यामुळे इंटरचेंज, रेल्वेक्रॉसिंग ब्रिज, बोगदा किंवा अन्य तत्सम कामे कुशल मनुष्यबळाअभावी मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.
महामार्गाच्या कामासाठी आणलेली मोठमोठी यंत्र चालविणाऱ्या मनुष्यबळअभावी पडून आहेत. इंटरचेंजच्या कामासाठी मोठमोठे काँक्रिट पेव्हर बसविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. लासूर स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंग पुलासाठी गर्डल उचलणारे मोठमोठे क्रेन आहेत. पण, ते चालविणारे तंत्रज्ञ नाहीत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे फॅब्रिकेशनची कामे थांबली आहेत.
चौकट...........
५० टक्केही काम सुरू नाही
यासंदर्भात ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, सध्या समृद्धी महामार्गावर दोन्ही कंत्राटदार संस्थांना ५० टक्के परप्रांतीय मजूर थोपवून धरण्यात यश आले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे ५० टक्केही काम सुरू नाही. यंत्रे चालविणारे तांत्रिक मजूर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री उभी आहे. लॉकडाऊन, ऑक्सिजनचा अभाव आणि मजुरांअभावी या महामार्गाची कामे जवळपास दोन महिने पुढे गेली आहेत.