औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी आमखास मैदानावर आयोजित प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्यासह महापुरुषांचा अपमान केल्यास कठोर कारवाईचे विधेयक विधानसभेत मांडल्याबद्दल आणि कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा भव्य सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी आयोजकांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र दिले. दरम्यान, आयोजकांनी कोर्टात धाव घेतल्याची माहिती आहे.
वंचित-एमआयएम यांची युती तुटल्यानंतर उदयास आलेल्या वंचित-एमआयएफ या नव्या आघाडीच्या शहरातील पहिल्याच कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. यात काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका शाळेत गणवेशावरून वादंग उठले होते. यात हिजाब गर्लच्या भूमिकेने देशभरातील वातावरण ढवळून निघाले. याच हिजाब गर्लच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्यासह महापुरुषांचा अपमान केल्यास कठोर कारवाईचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले आहे, यावर संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, रविवारी दिवसभर सोशल मीडियावर वंचित-एमआयएफच्या कार्यक्रमाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगीच दिली नाही, मुस्कान खान येणारच नाही, अशा पोस्ट एका पक्षाच्या समर्थकांनी टाकायला सुरुवात केली.
एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी तर सुपारी घेऊन हा कार्यक्रम असून, औरंगाबादकर सुजान आहेत, अशीही पोस्ट टाकली. मात्र, कार्यक्रमास परवानगी मिळाली आहे, सोमवारी आमच्या स्वयंसेवकांना पोलीस मार्गदर्शन करतील, अशी माहिती देत वंचितकडून देण्यात येत होती. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली,तशी माहिती आयोजकांना देण्यात आली. यामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, हिजाब गर्ल मुस्कान आणि एमआयएफ हे कार्यक्रमात काय बोलतील याबद्दलची उत्सुकता संपली आहे. दरम्यान, परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साज सायंकाळी पत्रकार परिषद होणार आहे. यात ते कोणावर निशाना साधतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आयोजक हायकोर्टात सभा आणि सत्कार सोहळा रद्द करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाविरोधात आयोजकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याबाबत वंचितचे प्रवक्त फारूक अहमद यांनी सांगितले की, आजच्या सभेस येणाऱ्या मुस्कान खान यांना औरंगाबाद पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या माध्यमातून घराबाहेर पडण्यास बंदी आणली. तसेच रात्री ११ वाजता सभेस परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र दिले. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात आयोजकांनी दाद मागितली आहे. न्यायालयाने २२ तारखेला पोलिसांना सभा का रद्द केली याबाबत बाजू मांडण्यास सांगितले आहे.