औरंगाबाद : ऐतिहासिक हिमायत बागेत मागील अनेक दशकांपासून परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत फळ संशोधन केंद्र चालविण्यात येत होते. आता तब्बल ३०० एकरहून अधिक मोठा परिसर जैवविविधता प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात पहिली बैठकही घेण्यात आली. प्रकल्पातील लहान-मोठी अतिक्रमणे काढून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंब्रेला वेलफेअर फाउंडेशनतर्फे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने हिमायतबाग जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी कृषी विद्यापीठाने यासंदर्भात महापालिकेकडे रीतसर प्रस्तावही दाखल केला. या प्रस्तावानुसार महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समितीची बैठक १२ जुलै रोजी घेण्यात आली. बैठकीत ऐतिहासिक हिमायतबागेसंदर्भात उपस्थित तज्ज्ञांनी सविस्तर चर्चा केली.
हिमायतबागचा परिसर जवळपास ३०० एकरपेक्षा अधिक आहे. यापूर्वी जमिनीची मोजणीही करण्यात आली आहे. आरेफ कॉलनी, जलाल काॅलनी, उद्धवराव पाटील चौक आदी तिन्ही परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. जैवविविधता समितीने अगोदर अतिक्रमणमुक्त परिसर करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसरात कम्पाऊंड करावे, असे नमूद केले. त्यानुसार महापालिकेने १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले. या पत्रात न्यायालयाच्या आदेशानुसार दोन आठवड्यात कारवाई पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात नमूद करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाने नव्याने प्रस्ताव जैवविविधता समितीसमोर ठेवावा, असेही सूचित करण्यात आले.
राज्यातील पहिला मोठा प्रकल्प३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. पुण्यात ३४ एकर जागेवर अशा पद्धतीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिमायतबागला वारसा स्थळ घोषित केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, पर्यटनाच्या दृष्टीनेही बराच फायदा होईल.
मोठी वनसंपदाहिमायबागेत मोठी वनसंपदा आहे. साधारण ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची झाडे या ठिकाणी आहेत. १२० प्रकारचे प्राणी, पक्ष्यांचा या ठिकाणी वावर आहे. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर हिमायतबाग वाचावा, अशी मागणी करीत होते.