हिंगोली : शहरातील बांगरनगर येथे आज दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून कपाटातील दहा तोळे सोने व दहा हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. शहरात भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून चोरी झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिंगोली शहरातील गजबजलेल्या ठिकाणी बांगरनगर आहे. परंतु या गजबजलेल्या वस्तीतच भरदिवसा चोरी झाली. बांगरनगर येथील सुर्यकांत परसराम बांगर यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली. मुलाच्या अडमिशनसाठी ते घराबाहेर पडले होते. परंतु घरी परत येताच त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करताच बांगर यांना लोखंडी कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून सोने व रोकड लंपास केले. हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल व पोलीस कर्मचारी पंचनामा करत असून याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. लवकरच गुन्हा दाखल करून घेतला जाईल असे पोनि चंदेल यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. भरदिवसा शहराच्या ठिकाणी चोरी झाल्याने याबाबत नागरिकांत एकच चर्चा होत आहे.