लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकीकडे २४ तास वीजपुरवठ्याच्या वल्गना केल्या जात असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र महावितरणच्या अवकृपेने नेमके किती तास भारनियमन सुरू आहे, हेही कळयला मार्ग नाही. लघुव्यावसायिक तर यात पार भरडून निघाले आहेत.सण, उत्सवाच्या काळात २४ तास वीजपुरवठा केला म्हणून की काय सध्या शहरात कायम आठ ते दहा तासांचे भारनियमन होत आहे. शहरातील काही भागांना तर महावितरणने जणू ठरवून लक्ष्य केल्याचे चित्र आहे. त्यात बांगरनगर, जिजामातानगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, गांधी चौक मार्ग व परिसर या भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे या भागातून मागील काही दिवसांपासून नागरिकांतून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. शिवाय याच भागात जवळपास व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. त्यांना या भारनियमनामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इन्व्हर्टरही तीन ते चार तासच चालते. मात्र दिवसातून सात ते आठ तास भारनियमनातच जात आहेत.कधी भारनियमन तर कधी दुरुस्तीचे कारण सांगितले जाते. त्यामुळे अधिकाºयांनाच नेमका काही बोध होत नसेल तर महावितरणचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे, याची प्रचिती येते. तर पावसाळापूर्व दुरुस्तीत केलेला लाखोंचा खर्च मग नेमका कशावर खर्च केला? याचाही शोध लागणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी चक्क उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाºयांच्या कंत्राटदारीवर बोट ठेवले होते. त्यामुळे महावितरणची चौकशीही लागली होती. सर्व कामांची अंदाजपत्रके व संचिकाही मागविल्या गेल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले, हे काही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे शहरातील दुरुस्तीची कामे केल्याचे सांगितले जात असले तरीही जागोजाग वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा दिसत आहेत.महावितरणकडून अधिकाºयांना खडसावणीच्या सुरात बोलणाºयांची कामे तेवढी वेळेत होतात, इतरांना मात्र बोलायलाही त्यांना फुरसत नसते, अशी गत झाली आहे. मात्र सामान्यांनी आवाज चढविल्यास त्याला शासकीय कामात अडथळ्याचे हत्यार दाखवून माघारी फिरविण्याचे प्रतापही काही अधिकारी करीत आहेत. या सर्व भानगडीत नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यासही नवल नाही.
हिंगोलीत भारनियमनाचा झाला कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:11 AM