औरंगाबाद: शिवसेना उद्धव ठाकरे गटातून जहरी टीका होत आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री किंवा बाळासाहेबांची शिवसेना यातून कोणी उत्तर देत नसल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेतून तडीपार झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा सणसणीत टोला सत्तार यांनी टीकाकारांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांवर जोरदार टीका करत आहेत. चौफेर टीकेने अंधारे उद्धव गटाच्या स्टार नेत्या झाल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्यातील गाजलेल्या भाषणानंतर अंधारे यांनी ठाण्यात देखील मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांवर टीका केली. याची चर्चा सुरु असताना मात्र शिंदे गटातून टीकेस काहीच प्रत्युत्तर देण्यात नसल्याचे चित्र आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, आम्हाला सर्व लक्षात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री संयमी आहेत. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. सत्तेतून तडीपार झाल्याने मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही सत्तार यांनी टीकाकारांना लगावला.
हिंदुत्व सोडल्यामुळेच कम्युनिस्ट जवळ आले अंधेरी पोट निवडणुकीत उद्धव ठाकरे सेना आणि भाजप-शिंदे गटात जोरदार लढत होण्याचे चिन्ह आहेत. निवडणुकीचे उमेदवारीवरून रणकंदन सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एकेकाळचे कट्टर विरोधक भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी पाठिंबा दिला आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने देखील ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने जाहीर केले होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणून होत आहे. यामुळे तर मुख्यमंत्री शिंदे यांनी उठाव केला. येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हेच खरे हिंदुत्ववादी असतील असेही सत्तार यांनी सांगितले.