Rajnath Singh on on Aurangzeb Controversy: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहर चर्चेचा विषय ठरले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी काही संघटनांनी आणि पक्षांनी केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, नागपुरात जातीय हिंसाचारही घडवण्यात आला. अशातच आता महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत, मुघल शासक औरंगजेब नाही, असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम सैनिक असल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटले. मेवाडचे शासक आणि शूर राजा महाराणा प्रताप यांचा पुतळा छत्रपती संभाजीनगरमध्ये बसवण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना, "महाराणा प्रताप यांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य श्रेय दिले नाही. महाराणा प्रताप यांनी देशभक्तीसाठी धाडस दाखवले आणि स्वाभिमानाशी तडजोड केली नाही," असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
"महाराष्ट्राची ही भूमी शौर्य आणि बलिदानाची भूमी आहे. ही ती भूमी आहे जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राष्ट्रीय नेत्याला जन्म दिला. आणि आज आपण ज्या महाराणा प्रताप यांच्यासमोर उभे आहोत त्यांचा पुतळा देखील छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. जेव्हा जेव्हा कोणी एखाद्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर आणि संस्कृतीवर वाईट नजर टाकतो तेव्हा हे संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर कोणीतरी महापुरुष जन्माला येतो. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या वीरांचे संपूर्ण जीवन याचा पुरावा आहे. महाराणा प्रताप स्वतःसाठी लढले नाहीत. जर त्यांना हवे असते तर ते अकबराचे वर्चस्व स्वीकारून आनंदाने जगू शकले असते. पण अधीनता स्वीकारणे त्याच्या रक्तात नव्हते आणि त्यांनी मुघल सल्तनतला आव्हान दिले," असे राजनाथ सिंह म्हणाले.
"आज आपल्या तरुण पिढीला योग्य इतिहासाची ओळख करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी सारखे शूर पुरुष केवळ इतिहासाच्या पानांवर मर्यादित नाहीत तर ते प्रेरणेचे जिवंत स्रोत आहेत. येणाऱ्या पिढ्यांना त्या महान आत्म्यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी याची खात्री आपण केली पाहिजे. हा खरा इतिहास आहे आणि हेच आपले कर्तव्य आहे. औरंगजेबासारख्या क्रूर आणि निर्दयी शासकालाही आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ग्लोरिफाईड केले गेले आहे. या चुकीच्या इतिहासामुळे काही लोक औरंगजेबाला हिरो बनवण्याचा प्रयत्न करतात. सत्य जाणून न घेता औरंगजेबाबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असे संरक्षण मंत्री म्हणाले.
"पंडित जवाहरलाल नेहरूंनी औरंगजेबाला धर्मांध आणि कट्टर शासक म्हटले आहे. त्यांनी लिहिलं होतं की त्याने हिंदूंवर जझिया कर लादला. त्याने राजपूत, शीख, मराठा, राष्ट्रकुट इत्यादी सर्व लोकांना दडपण्याचा प्रयत्न केला. त्याने आपली अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. असा शासक कोणाचाही नायक कसा असू शकत नाही," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
"आम्ही धर्माचे राजकारण करत नाही. आपल्यासाठी सर्व भारतीय समान आहेत. ही आपली संस्कृती आहे. हे आमचे मत आहे. आपण हे आपल्या पूर्वजांकडून शिकलो आहोत. हे मी आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहे. महाराणा प्रताप यांच्याकडून शिकलो आहे. आमचे आदर्श अजिबात इस्लामविरोधी आणि मुस्लिमविरोधी नव्हते. हकीम खान सुरी यांनी मुघलांविरुद्ध हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रताप यांच्यासोबत लढाई केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातही मुस्लिम समाजाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये सर्वात विश्वासू सेवक मदारी नावाचा एक मुस्लिम तरुण होता. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज असे आमचे वीर आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांना आपले आदर्श मानत होते. शिवाजी महाराजांनी महाराणा प्रताप यांच्या गनिमी कावा पद्धतीपासून प्रेरणा घेतली. शिवाजी महाराजांनीही त्यांच्या नातवाकडून महाराणा प्रताप यांचे चित्र मोठ्या आदराने मागितले होते," असेही राजनाथ सिंह म्हणाले.